हिंगोली;पुढारी वृत्तसेवा: देशात बेकायदा धर्मांतरण अन् लव्ह जिहाद प्रकाराला आळा घालण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मुक मोर्चा काढण्यात आला. समाजातील या प्रश्नावर कठोर कायदा करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी (दि.८) काढण्यात आलेल्या या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी हजारो आंदोलक या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्च्याच्या समर्थनार्थ व्यापाऱ्यांनीही बाजारपेठा कडकडीत बंद ठेवली होती.
हिंगोलीत गुरुवारी सकाळी महात्मा गांधी पुतळ्यापासून मूक मोर्चाला सुरूवात करण्यात आली. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, माजी आमदार गजानन घुगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, युवासेनेचे जिल्हा प्रमुख राम कदम यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चात महिला व तरुणींची उपस्थितीही लक्षणीय होती. हातात निषेधाचे फलक घेऊन निघालेला मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर महिलांच्या एका शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्याकडे निवेदन सादर केले.
या वेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील काळात अनेक प्रलोभने दाखवून हिंदूंचे धर्मांतरण करण्यात आले आहे. हिंदू मुलींना प्रेमाच्या जोळ्यात ओढून त्यांचे बळजबरीने धर्मांतरण करण्याचा प्रकार सुरू आहे. लव्ह जिहादच्या नावाखाली अनेक मुलींना पळवून नेऊन त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सध्या सर्वत्र सुरू असलेल्या अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी लव्ह जिहाद विरोधी कायदा करावा. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच हि प्रकरणे हाताळण्यासाठी स्वतंत्र न्यायालयाची स्थापना करण्याची मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली. शिवाय दिल्ली येथील श्रध्दा वालकर खून प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आफताब पुनावाला यास फाशी द्यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हेही वाचा :