मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क -श्रद्धा वालकरचं जे झालं ते इतरांसोबत होऊ नये म्हणून आंतरधर्मीय विवाह-परिवार समन्वय समिती स्थापन केल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. लोढा यांच्या अध्येक्षतेखाली १३ सदस्यांची समिती नेमण्यात आलीय.
वालकर हत्येच्या पार्श्वभूमीवर समन्वय समिती स्थापन करण्यात आलीय. वालकर घटना धक्कादायक असल्याचे लोढा म्हणाले. वादविवादाचं निराकरण करणं हे काम असून पुन्हा अशी घटना होऊ नये म्हणून समिती आणल्याची माहिती लोढा यांनी दिली. या पार्श्वभूमीवर लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा येणार का? असा सवाल केला जात आहे.
श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाह करणाऱ्या व्यक्तींची इत्थंभूत माहिती जमा करणे, नवविवाहित मुली- महिलांचा आई-वडिलांशी संपर्क – समन्वय घडवून आणणे, आईवडील किंवा मुली समन्वयासाठी तयार नसतील तर समुपदेशनातून वाद मिटविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम परिवार समन्वय समितीच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे लोढा यांनी म्हटले आहे.
महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली परिवार समन्वय समितीत तेरा सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. आई-वडील इच्छुक नसल्यास समुपदेशनातून त्यांच्यातील वादाचे निराकरण करण्याचे काम समन्वय समिती करणार आहे.
या समितीत महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव, महिला व बालविकास आयुक्त, विभागाचे सहसचिव, नांदेडचे अॅड. योगेश देशपांडे, औरंगाबादचे संजीव जैन, नाशिकच्या सुजाता जोशी, मुंबईतून अॅड. प्रकाश साळशिंगीकर, नागपूरमधून यद् गौडिया, अकोल्यातून मीराताई कडबे, पुण्यातून शुभदा कामत, मुंबईतून योगीता साळवी, उपायुक्त महिला व बालविकास आयुक्तालय यांचा समावेश आहे.