

चारठाणा; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील महात्मा गांधी सेवा संघ या संस्थेला दिव्यांग क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शनिवारी (दि.३) अपंग दिनानिमित्त दिल्ली येथे विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते संस्थेचे सचिव विजय कान्हेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी १९९४ मध्ये परभणी येथे महात्मा गांधी सेवा संघ या संस्थेची स्थापना झाली. २००५ साली संस्थेचे पहिले मुख्यालय औरंगाबाद येथे गांधी भवन समर्थनगर येथे सुरू करण्यात आले. या ठिकाणी कृत्रिम अवयव निर्माण केंद्राची स्थापना करण्यात आली. त्यानंतर राज्यभरात शाखेचा विस्तार करत या संस्थेने दिव्यांगांसाठी अविरत कार्य सुरू ठेवले. तसेच दिव्यांगांना आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे मोफत वितरण केले. तांड्या वस्तीतील दिव्यांगांना त्यांच्या घरी जाऊन कृत्रिम अवयव देण्यासाठी संस्थेने सन २०११ मध्ये सुसज्ज अशी मोबाईल व्हॅन तयार केली. मोबाईल व्हॅनद्वारेच दिव्यांगांना आजही साहित्य पोहचवले जाते.
महात्मा गांधी सेवा संघ हे आर्टफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कार्पोरेशन ऑफ अधिकृत विक्रेते देखील आहेत. पॉलिसी डिझाइनिंग व अंमलबजावणी, एक्सेसीबिलिटी ऑडिट कन्सल्टन्सी आणि तरतुदी सर्वेक्षण, संशोधन आणि कृती योजना विकास अशा इतर व्हर्टिकलवरही महात्मा गांधी सेवा संघ काम करते. याच कार्याची देशपातळीवर दखल घेत संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी शशिकांत देशपांडे- जोगवाडकर, मुख्याधिकारी अमेय अग्रवाल, संस्थापक सतीश निर्वळ व समन्वयक देविदास कान्हेकर, समृद्धी कुलकर्णी, नरोत्तम शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब जोगवाडकर, संभाप्पा गजमल, मुख्याध्यापक जाधव एस एन, राम जाधव, बाबासाहेब टाके, पांडुरंग डुबे, माधव नाईक, उमाकांत क्षीरसागर, शाम गजमल आदींसह शिक्षक उपस्थित होते.