लोणावळा : एसटी बसचा प्रवास पडला 3 लाखाला, अनोळखी महिलेला दाखविलेली दया पडली महागात | पुढारी

लोणावळा : एसटी बसचा प्रवास पडला 3 लाखाला, अनोळखी महिलेला दाखविलेली दया पडली महागात

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : एसटी बसचा प्रवास एका महिलेला चांगलाच महागात पडला आहे. एका अनोळखी महिलेवर दाखविलेली दया ही 3 लाखांचा भुर्दंड देऊन गेली आहे. ही घटना मागील महिन्यात 17 नोव्हेंबरला सायंकाळी घडली होती. उज्ज्वला गौतम भोसले (वय 50 वर्षे, कल्याण पूर्व) या 17 नोव्हेंबर रोजी एसटीमधून प्रवास करत असताना एक अनोळखी महिला लहान बाळाला दूध पाजायचे आहे, असे सांगून भोसले यांच्या सिटवर पायाजवळ बसली.

बाळाच्या अंगावर कपडा टाकत तिने हातचलाखीने सिटच्या खाली ठेवलेल्या बॅगमधून सोन्याचा ऐवज असलेली पर्स चोरली. त्या पर्समध्ये 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 3 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 40 हजार रुपये किंमतीचे 1 तोळे वजनाची सोन्याची चेन, 50 हजार रुपये किंमतीचा 12 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, 40 हजार रुपये किंमतीचे 1 तोळे वजनाचे सोन्याचे कानातले, 30 हजार रुपये किंमतीचे 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी व वाट्या, 4 हजार रुपये किंमतीचे 6 ग्रॅम वजनाचे चांदीच्या पटया व जोडवे असा एकूण 2 लाख 84 हजार रुपये किंमतीचा ऐवज होता.

ही अनोळखी महिला ही लोणावळ्यात वलवण पुलाजवळ एसटीमधून खाली उतरली. भोसले त्यांच्या ठिकाणावर पोहोचल्यानंतर त्यांना बॅगमधून सोन्याचा ऐवज असलेली बॅग गायब असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कोळसेवाडी पोलिस ठाणे, मुंबई येथे दि. 17 नोव्हेंबर रोजी फिर्याद दाखल केली. लोणावळा शहर पोलिस स्टेशनला तपासाकरिता ती तक्रार नुकतीच वर्ग करण्यात आली आहे. या घटनेचा लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत, याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शकिल शेख पुढील तपास करत आहेत.

Back to top button