कृषीमंत्री सत्तार यांच्या निषेधार्थ घोषणा देत अंबाजोगाईमध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन | पुढारी

कृषीमंत्री सत्तार यांच्या निषेधार्थ घोषणा देत अंबाजोगाईमध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल  सत्तार यांना सर्वच स्तरातून धारेवर धरले जात आहे. या धर्तीवर अंबाजोगाईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नेते व कार्यकर्त्यांनी बस स्थानकासमोर आज आंदोलन केले. यावेळी कृषीमंत्री सत्तार यांच्या पुतळ्याला चपलाचा हार घालून जोडामारो आंदोलन करण्यात आले. तसेच निषेधाच्या घोषणा देत त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.

दरम्यान, राज्यभरातून सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध होत असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली कृषिमंत्री सत्तार यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. सर्व पक्षीय विरोध होत असल्याचे पाहून सत्तार यांनी नंतर आपले वक्तव्य मागे घेत माफी मागितली आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज राज्यभर कृषीमंत्री सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला जात आहे.

कृषीमंत्री सत्तार यांच्या बेताल वक्तव्यानंतर सर्वात प्रथम सोशल मीडियावर निषेध करत असल्याचा व्हिडिओ केज विधानसभेचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी अपलोड केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सत्तार यांचा पुतळा बनवण्यापासून 50 खोके व त्यावर 50 खोके एकदम ओके अशा घोषणा चिकटवण्यात आल्या. यावेळी माजी आमदार साठे यांनी पुढाकार घेऊन आंदोलनाची जोरदार तयारी केली.
यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे, संजय भाऊ दौंड, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, डॉ नरेंद्र काळे, शिवाजी शिरसाठ, राजेश्वर चव्हाण, बालाजी शेरेकर, प्रमोद भोसले, अजीम जरगर, किशोर परदेशी, यांच्यासह नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

हे वाचलंत का?

Back to top button