अमरावती : अब्दुल सत्तारांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे जोडामारो आंदोलन | पुढारी

अमरावती : अब्दुल सत्तारांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे जोडामारो आंदोलन

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना अत्यंत गलिच्छ भाषा वापरल्याने त्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. अमरावती येथे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पंचवटी चौकात सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. सत्तारांच्या प्रतिमेला जोला मारो आंदोलन करण्यात आले. तसेच सत्तार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

कृषिमंत्री सत्तार यांनी औरंगाबादमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले. सत्तारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अमरावती शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोडा मारो आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोपर्यंत अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेणार नाहीत, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. सत्तार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. सत्तारांवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत आपण येथून हलणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. याबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीच्या प्रदेश पदाधिकारी सुरेखा ठाकरे, शहराध्यक्ष प्रशांत डवरे, जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, महिला जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, भास्करराव ठाकरे, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष हाजी रफिक भा, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष वाहिद खान, माजी सभापती अविनाश मार्डीकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष ऋतुराज राऊत, गुड्डू धर्माळे, निलेश शर्मा, प्रशांत महल्ले, अनिल ठाकरे, आकाश हिवसे, सुषमा बर्वे, कल्पना वानखडे, संकेत बोके, निखिल रहाटे, मनीष पाटील, दिग्विजय गायगोले, जयेश सोनोने, मनीष पेठे, अक्षय बुरघाटे, सारंग देशमुख, शिवाजी गतपणे, अभिषेक गोळे, प्रथमेश बोके, सचिन खंडारे, सचिन दळवी, प्रथमेश ठाकरे, अभिजीत लोयटे, पंकज हरणे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button