जालना : जांब समर्थ येथे चोरी झालेल्‍या सर्व मूर्ती सापडल्‍या, भाविकांमध्‍ये समाधान | पुढारी

जालना : जांब समर्थ येथे चोरी झालेल्‍या सर्व मूर्ती सापडल्‍या, भाविकांमध्‍ये समाधान

जालना; पुढारी वृत्तसेवा : घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातून चोरी झालेल्या मूर्तीपैकी आणखी तीन मूर्ती पोलिसांनी हस्‍तगत केल्‍या आहेत. चोरी झालेल्या सर्व मूर्ती  सापडल्याने भाविकांमधून समाधान व्‍यक्‍त होत आहे.

जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातील समर्थ रामदास स्वामी पूजा करीत असलेल्या १३ मूर्ती चोरीस गेल्‍या होत्‍या. २२ ऑगस्ट रोजी ही खळबळजनक घटना घडली होती. या चोरीतील पाच आरोपींकडून यापूर्वी १० मूर्ती जप्‍त केल्‍या होत्‍या. दरम्यान, पोलिसांनी हैदराबाद येथून पकडलेल्या गौरीशंकर लादुराम वर्मा या आरोपीकडून समर्थ रामदास स्वामी दंडावर बांधत असलेली हनुमानाची मूर्ती आणि दोन्ही हात जोडलेली हनुमानाची मूर्ती तसेच राम सीताची तांब्याची मूर्ती जप्‍त केल्या आहेत. स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. मुख्य आरोपी शेख जिलानी हसेन शेख, राजु शेख हुसेन शेख, महादेव शिवराम चौधरी, शेख पाशामिया शेख मशाकसाब व गौरीशंकर लादुराम वर्मा या संशयित आरोपींना अटक करण्‍यात आली आहे. .

संशयित आरोपी गौरीशंकर लादुराम वर्मा हा हैदराबाद येथील बरकतपुरा भागात राहतो. त्याचा शोभेच्या वस्तु बनविण्यासह मूर्ती खरेदी- विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या दोन महिन्यांपेक्षा जांब समर्थ येथील मूर्ती चोरीचा तपास न लागल्याने भाविकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. पोलिसांनीही मूर्ती चोरी प्रकरणाची माहिती देणार्‍यास २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलिसांना या प्रकरणातील धागेदोरे हाती लागले. त्यानंतर एक-एक आरोपी जेरबंद करीत पोलिसांनी तपासाची साखळी पूर्ण करीत चोरीस गेलेल्या सर्व १३ मूर्ती हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे भाविकांमधून समाधान व्‍यक्‍त होत आहे.

हेही वाचा;

Back to top button