बीड: डोणगाव येथे विहिरीत बुडून विवाहितेचा मृत्यू | पुढारी

बीड: डोणगाव येथे विहिरीत बुडून विवाहितेचा मृत्यू

केज: पुढारी वृत्तसेवा: शेतात जात असताना वाटेत तहान लागल्याने विहिरीवर पाणी पिताना पाय घसरून पडलेल्या २० वर्षीय विवाहितेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना डोणगाव (ता. केज येथे सोमवारी दुपारी २ च्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, डोणगाव (ता. केज) येथील वैष्णवी लक्ष्मण भुसारे (वय २०) ही विवाहिता आपल्या सासूसोबत सोमवारी दुपारी शेतात जात होती. वैष्णवी हिला वाटेत तहान लागल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या नवनाथ घुले यांच्या शेतातील विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेली. पाणी पीत असताना पाय घसरल्याने ती विहिरीत पडली. त्यानंतर तिच्या सासूने आरडाओरडा करून नागरिकांना मदतीला बोलाविले. मात्र, तोपर्यंत वैष्णवी हिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक दिलीप गित्ते, महादेव बहिरवाल, बाळासाहेब अहंकारे, शमीन पाशा यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. केज येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button