भंडारा : सावकाराला दम देण्यासाठी चोरले रिव्हॉल्व्हर; पोलीस शिपायाच्या कृत्याने खळबळ | पुढारी

भंडारा : सावकाराला दम देण्यासाठी चोरले रिव्हॉल्व्हर; पोलीस शिपायाच्या कृत्याने खळबळ

भंडारा : पुढारी वृत्तसेवा : कर्जबाजारीला त्रस्त होऊन भंडारातील एका पोलीस शिपायाने सावकाराला दम देण्यासाठी भंडारा न्यायालयाच्या पोलीस गार्ड रुममधून चक्क एक रिव्हॉल्व्हर व ३५ काडतूस चोरले. पोलीस दलात खळबळ उडविणाऱ्या या घटनेच्या चौकशीअंती त्या पोलीस शिपायाला अटक करुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेली रिव्हॉल्व्हर व काडतूस जप्त करण्यात आले आहेत.

नीलेश खडसे (रा. गणेशपूर) असे अटक केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. नीलेश हा भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयात मुद्देमाल कक्षात तैनातीवर होता. घटनेच्या दिवशी आरोपी नीलेशची ड्युटी नसताना तो गार्ड रुममध्ये बॅग घेऊन आला व ५ मिनिट थांबून शस्त्रांची तपासणी करून बॅगसह निघून गेला. दरम्यान, त्या कक्षातील सहायक फौजदार सुनील सायम यांच्या नावाने असलेली ०.३८ शासकीय रिव्हॉल्व्हर आणि ९ एमएमचे ३५ काडतूस चोरी गेल्याचे लक्षात येताच त्यांनी ही माहिती पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षकांना दिली.

राखीव पोलीस निरीक्षकांनी चोरीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांत तक्रार केली. पोलीस अधीक्षकांना घटनेची माहिती मिळताच तपासाला गती देण्यात आली. तेथील कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदविण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर पोलीस नाईक नीलेशच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याचीच उलटतपासणी घेतली. अखेरीस त्याने केलेल्या कृत्याचा उलगडा झाला. पोलिसांनी त्याने चोरलेली रिव्हॉल्व्हर व ३५ काडतूस जप्त केले आहेत. त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.

सावकाराला देणार होता दम

आरोपी नीलेशने सावकाराकडून कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याच्याकडे तगादा लावला जात होता. त्या सावकाराला धडा शिकविण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली नीलेशने दिली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button