उस्मानाबाद : पीकविम्यासाठी शेतकऱ्यांसह शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीवर आंदोलन | पुढारी

उस्मानाबाद : पीकविम्यासाठी शेतकऱ्यांसह शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीवर आंदोलन

उस्मानाबाद; पुढारी वृत्तसेवा : 2020 च्या पीकविम्याच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख आ. कैलास पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. तरीही प्रशासनाने याची दखल न घेतल्याने शिवसैनिकांसह शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर अंदोलन केले.

आ. पाटील यांची ढासळत असलेली प्रकृती पाहता तातडीने हस्तक्षेप करुन शेतकर्‍यांच्या खात्यावर विमा जमा करावा, अशी घोषणाबाजी सुरु केली आहे. या प्रकारामुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे. बजाज अलायन्स कंपनीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकर्‍यांच्या खात्यावर पीकविमा जमा केलेला नाही. त्यामुळे आ. पाटील यांनी दिवाळीपासूनच उपोषण सुरु केले आहे.

पाटील यांच्या उपोषणाचा आज (दि. 28) पाचवा दिवस आहे. दरम्यान, आज सकाळीच अतिरीक्‍त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तानाजी लाकाळ यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने पाटील यांच्या तब्येतीची तपासणी केली. त्यानंतर डॉ. लाकाळ यांनी आ. पाटील यांचे वजन 4 ते 5 किलोने घटले असल्याचे सांगितले. उपोषण सुरुच राहिले तर आणखी शारीरिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर अंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना खाली आणण्यासाठी प्रशासनाची कसरत चालू आहे. पोलिसांनीही त्यादृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचे आवाहन केले होते.

हेही वाचलंत का ?

Back to top button