हिंगोली : मुसळधार पावसाने लाखोंच्या फटाक्‍यांवर फिरवले पाणी | पुढारी

हिंगोली : मुसळधार पावसाने लाखोंच्या फटाक्‍यांवर फिरवले पाणी

जवळाबाजार; पुढारी वृत्‍तसेवा : जवळाबाजार भागात मागील आठ दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. यामुळे खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज (शुक्रवार) पहाटे ४ वाजता विजेच्या कडकडाटात व वाऱ्यासह ढगफुटीसदृष्‍य मुसळधार पाऊस झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले. दरम्‍यान दिवाळीच्या फटाक्यांचा व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळी चार वाजता विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस जवळपास दोन तास पडत होता. सध्या दिपावली निमित्‍त फटाक्यांची दुकान थाटण्यात आली आहेत. येथील बाजार समिती परिसरात तरुणांनी पार्टनरशिप मध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांची दुकाने उभारली आहेत. बाजार समिती परिसरात पत्र्याची शेड करून दुकाने उभारून लाखो रुपयांची फटाक्यांचा माल भरण्यात आला होता.

मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे फटाक्‍यांच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात मंदीचे वातावरण आहे. यावर्षी फटाक्यांचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालेल या आशाने परिसरातील तरुण मंडळींनी मोठ्या प्रमाणात पार्टनरशिपमध्ये लाखो रुपयांचा फटाक्‍यांचा माल खरेदी करून दुकाने थाटली आहेत. दिपावलीस दोन ते तीन दिवस शिल्लक असताना अचानक आज (शुक्रवार) पहाटे चार वाजता विजेच्या कडकडाटात व जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. यामुळे फटाक्यांच्या दुकानातील माल भिजून फटाक्‍यांचे नुकसान झाले आहे.

अचानक आलेल्‍या पावसाने फटाका दुकानदारांची मोठी तारांबळ उडाली. सकाळी तीन वाजल्यापासून परिसरातील वीजपुरवठा खंडित झालेला होता. यामुळे अंधारातच वरून मुसळधार कोसळणाऱ्या पावसात फटाका दुकानदारांनी आपल्या दुकानातील माल पावसापासून इतरत्र सुरक्षीत ठिकाणी हलवला. मात्र या पावसात मोठ्या प्रमाणात फटाक्यांचे नुकसान झाले. अचानक आलेल्‍या या पावसाने फटक्यांचा व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांच्या व्यवसायावर पाणी फिरवले. यामध्ये फटाक्यांचा व्यवसाय करणाऱ्या  मंडळीचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्‍यान, परिसरात शेतकरी बांधवांकडून सध्या खरीपातील सोयाबीन पीक काढण्याची लगबग सुरू आहे. अचानक आलेल्‍या मुसळधार पावसाने सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर ओढ्या, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी आल्याने परिसरातील विविध गावाचा संपर्क जवळा बाजारशी तुटला आहे. या परिसरातील जवळपास ४० ते ५० गावातील दैनंदिन व्यवहार येथील बाजारपेठत होत असतो. सकाळच्या वेळी दुग्ध व्यवसाय, भाजीपाला घेऊन मोठ्या प्रमाणात जवळाबाजार येथे शेतकरीबांधव घेऊन येत असतात. पण अचानक आलेल्या पावसाने ओढ्या, नाल्यास पूर आल्याने जवळा बाजार परिसरातील गावांचा जवळा बाजारशी संपर्क पावसामुळे तुटला आहे. यामुळे शेतकरी, दुग्‍ध व्यावसायीकांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा :  

 

Back to top button