औरंगाबाद : ६ हजारांची लाच घेताना सफाई कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात | पुढारी

औरंगाबाद : ६ हजारांची लाच घेताना सफाई कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : सफाई कर्मचारी महिलेची दोन दिवसांची गैरहजेरी सफाई निरीक्षकांना पाठवू नये तसेच मागील हजेऱ्या लावण्यासाठी ६ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महापालिकेचा सफाई कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. इस्माईल शमशू पठाण (वय ४९, रा. ईब्राहीमशाह कॉलनी, पहाडसिंगपुरा) असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो मनपाच्या झोन क्र. ४ मध्ये सफाई कर्मचारी व तात्पूरता मुकादम आहे.

अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची पत्नी झोन क्र. ४ मध्ये सफाई कर्मचारी आहे. त्यांची दोन दिवसांची गैरहजेरी पडली होती. ही गैरहजेरी सफाई निरीक्षकांना न पाठविण्यासाठी आणि मागील काही हजेऱ्या लावून घेण्यासाठी त्यांनी तात्पूरता मुकादम असलेल्या इस्माइल पठाण याला विनंती केली. त्याने यासाठी सहा हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार एसीबीचे अधीक्षक डॉ.राहुल खाडे यांनी औरंगाबाद विभागाचे उपअधीक्षक मारूती पंडीत यांना चौकशीचे आदेश दिले. त्यांनी पोलिस निरीक्षक हनुमंत वारे यांना सापळा रचण्यास सांगितले. वारे यांनी तक्रारीच्या अनुषंगाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. आज सकाळी सातच्या सुमारास इस्माइल लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई पोलिस निरीक्षक वारे यांच्यासह पोलिस अंमलदार साईनाथ तोडकर, विलास चव्हाण, केवलसिंग घुसिंगे, चंद्रकांत शिंदे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा :

Back to top button