

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील एकनाथ साखर कारखान्यासमोर अंडा आम्लेट गाडीवर मंगळवारी किरकोळ कारणावरून तरूणावर शस्त्राने हल्ला केल्याीची घटना घडली होती. यातील जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अब्दुल उर्फ सांडू कम्मा शेख (वय ३५, रा. पिंपळवाडी पिराचे) असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी संशयीत आरोपी रामेर उर्फ राम गजेसिंग बाते (रा. साखर कारखाना कॉलनी, एमआयडीसी, पैठण) याला अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, पैठण एमआयडीसीतील एकनाथ साखर कारखान्यासमोर अंडा आम्लेट विक्री गाडी आहे. येथे मंगळवारी दुपारी अब्दुल व रामेर यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. यावेळी रामेर उर्फ राम याने अब्दुल याच्यावर शस्त्राने वार केले. यामध्ये अब्दुल हा गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ जवळच्या पिंपळवाडी येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी त्याला औरंगाबाद येथे नेण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शफिक कम्मा शेख (रा. पिंपळवाडी, पिं) यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी रामेर उर्फ राम याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या परिसरात कारखाना, जयस्पिनर, ३२ नंबर, पेपरमिल, ईसरवाडी या परिसरातील फाट्यांवर अवैधरीत्या दारू विक्री होत आहे. परिसरात किरकोळ वादाच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. परिसरात पोलीसांचा वचक राहिलेला नाही. त्यामुळेच खुनासारख्या घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
हेही वाचा :