नांदेड: पतीच्या मृत्यूनंतर पत्नीसह तीन चिमुकल्यांचा आता भाकरीसाठी संघर्ष | पुढारी

नांदेड: पतीच्या मृत्यूनंतर पत्नीसह तीन चिमुकल्यांचा आता भाकरीसाठी संघर्ष

नरसीफाटा; सय्यद जाफर: नायगाव तालुक्यातील नरंगल येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांने नापिकी आणि कर्जाला कंटाळून शनिवारी आपली जीवनयात्रा संपविली. दिवाळीच्या तोंडावर जीवन संपवून घरातील कर्त्या पुरुषाने जगण्यातून सुटका करुन घेतली असली तरी मागे असलेल्यांचा भाकरीसाठी संघर्ष सुरु झाला आहे. घरातील परिस्थिती पाहता पत्नीसह तीन मुलींचे भविष्याचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आज (दि.१६) जागतिक अन्न दिवस आहे. या दिनाच्‍या पूर्वसंध्येला भाकरीसाठी संघर्ष करण्यात अपयश आल्याने गळफास घेवून नरंगल येथील अल्पभूधारक तरुण शेतकरी प्रदीप पट्टेकर यांने आपली जीवनयात्रा संपवली. निसर्गाच्या लहरीपणामुळे कापसाच्या वाती तर सोयाबीनचा चिखल झाल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरु झाला आहे.

नायगाव तालुक्यातील नरंगल येथील अल्पभूधारक शेतकरी प्रदीप पट्टेकर (३०) यांनी दि. १५ ऑक्टोबररोजी दुपारी नापिकी व कर्जाला कंटाळून जीवन संपवले. तीन भावात चार एकर शेती मयत प्रदीप यास पत्नी व तीन मुली आहेत. बँकेचे देणे, संसाराला लागणारा खर्च, मुलींचे शिक्षण यासाठीचा आर्थिक ताळमेळ बसवणे शक्य होत नाही. पत्नी व तीन चिमुकल्या मुलींच्या समोर जगण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे.
पत्नी संगीता यांचे वय (२८) वर्ष तर मुलगी प्राजक्ता (७), संस्कृती (४) आणि पुनम (२) वर्षाची आहे. राहण्‍यासाठी सुस्थितीत घर नाही. प्रदीपची पत्‍नी आता  तीन चिमुकल्यांना घेवून जगणार कशी ? संसाराचा गाडा ओढणार कुणाच्या भरवश्यावर ? ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने नरंगल येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घरातील कर्ता पुरुषच गेल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : 

Back to top button