सोलापूर : बार्शी तालुक्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान, वाहतुक देखील ठप्प | पुढारी

सोलापूर : बार्शी तालुक्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान, वाहतुक देखील ठप्प

बार्शी; पुढारी वृत्तसेवा : बार्शी शहर तालुक्यात सोमवारी (दि. १०) सायंकाळी व मंगळवारी (दि. ११) दुपारपासुन परतीच्या पावसाने  दमदार हजेरी लावली. त्यामुळे बार्शी शहरासह तालुक्यातील सोयाबीनसह उडीद, कांदा, मुग व इतर पिकाचे मोठे आर्थिक नुकसान  झाले आहे.

सोमवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास पांगरी परिसरात अतिवृष्टीसदृष्य पाऊस झाला. बार्शीच्या पूर्व व उत्तर भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे बार्शी-लातूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतुक ठप्प झाली होती. बार्शी-पांगरी-येडशी, बार्शी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वच रस्ते बहुधा पाण्याखाली आले होते. बार्शी शहराजवळील रेल्वे ब्रिजखाली पाणी साठले होते.

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या परतीच्या पावसाने बार्शी तालुक्यात पुन्हा धुमाकुळ घालण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस दैनंदिन हजेरी लावतच होता, मात्र मध्यंतरी थोडा खंड पडला होता. त्यामुळे तालुक्यात पुर्वीच्या पावसाच्या तडाख्यातुन वाचलेली सोयाबीनची पिके मातीमोल होऊन जात आहेत.

बार्शी शहरातील विविध भागासह  पांगरी, मळेगाव, उक्कडगांव, पांढरी, मांडेगाव, आगळगाव, चारे, जामगाव, घारी, कुसळंब आदी भागात तुफान पाऊस झाला.

हेही वाचा

Back to top button