उस्मानाबादेत एक दिवस आधीच धगधगली ‘मशाल’; असा जुळला योगायोग | पुढारी

उस्मानाबादेत एक दिवस आधीच धगधगली ‘मशाल’; असा जुळला योगायोग

उस्मानाबाद: भीमाशंकर वाघमारे: शिवसेनेच्या दोन गटांच्या चिन्ह वाटपावर राज्याचेच नव्हे, तर अवघ्या देशाचे लक्ष लागले होते. सोमवारी (दि. १०) निवडणूक आयोगाने अंतरीम आदेश देत ठाकरे गटाला मशाल चिन्हे दिले. त्यानंतर शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जल्‍लोष करीत ‘मशाली’चे स्वागत केले. वास्तविक धगधगत्या मशालीचे शानदार अनावरण एक दिवस अगोदर म्हणजे रविवारीच उस्मानाबादेत झाले होते. याची मोठी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

उस्मानाबादेत शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील आणि माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते ही धगधगती मशाल नागरिकांना पाहण्यासाठी रविवारी रात्र खुली झाली. शहरातील सांजा चौकात ‘भवानी ग्रुप’ने चौक सुशोभिकरणाचा एक भाग म्हणून तसेच तुळजाभवानी मातेचे एक प्रतीक म्हणून मशाल उभारली होती. यासाठी आ. पाटील यांनी आमदार निधीतून साह्य केले होते.

योगायोगाने तुळजाभवानी देवीच्या अश्‍विनी पौर्णिमा यात्रेनिमित्त रविवारीच या मशालीचे या तिन्ही नेत्यांनी अनावरण केले होते. तर दुसर्‍या दिवशी म्हणजे सोमवारी निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह बहाल केले. यानंतर मात्र, या तिन्ही नेत्यांनी अनावरण केलेल्या मशाल या प्रतिकृतीचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. योगायोगाने साधलेल्या या टायमिंगची खुमासदार चर्चा मात्र सर्वत्र सुरु आहे.

दांभिकतेला पळवून लावणारी ही मशाल तुळजाभवानी मातेचे आशीर्वाद नवरात्रोत्सवात सर्वत्र पोहोचवत असते. धगधगत्या मशालीला जसे धार्मिक महत्व आहे, तसेच वेगवेगळ्या पातळ्यांवरही आहे. देशावर, समाजावर आलेली संकटे पळवून लावण्यासाठी क्रांतीची मशालच उपयुक्‍त ठरली. तसेच आजच्या जुलमी व दांभिक सत्तेला हद्दपार करण्यासाठी हे चिन्ह नक्‍कीच महत्वाचे ठरेल.
– मकरंद राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष, उस्मानाबाद

हेही वाचलंत का ? 

Back to top button