न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड: भारताच्या इतिहासात प्रथमच वडिलांनंतर मुलगा होणार सरन्यायाधीश | पुढारी

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड: भारताच्या इतिहासात प्रथमच वडिलांनंतर मुलगा होणार सरन्यायाधीश

पुढारी ऑनलाईन: न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड हे भारताचे 50 वे सरन्यायाधीश होणार आहेत. सध्याचे सरन्यायाधीश यू. यू. लळीत यांनी कायदे मंत्री किरण रिजिजू यांच्याकडे आपला उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. उदय लळीत येत्या 8 नोव्हेंबर रोजी आपल्या पदावरून सेवानिवृत्त होतील. त्यानंतर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड 9 तारखेला नवे सरन्यायाधीश म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतील. ही एक ऐतिहासिक घटना असणार आहे, कारण प्रथमच वडिलांनंतर मुलगा सरन्यायाधीश होणार आहे.

न्या. चंद्रचूड यांचे वडील होते सरन्यायाधीश

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे वडील यशवंत चंद्रचूड देशाचे 16 वे सरन्यायाधीश होते. 22 फेब्रुवारी 1978 ते 11 जुलै 1985 पर्यंत म्हणजे जवळपास सात वर्षे ते सरन्यायाधीश होते. वडील निवृत्त झाल्यानंतर जवळपास 37 वर्षांनी धनंजय चंद्रचूड त्याच खुर्चीवर विराजमान होणार आहेत. चंद्रचूड यांच्या बाबतीत सांगायचे झाले तर त्यांनी आपल्या वडिलांचे 2 मोठे निर्णयही बदलेले आहेत. ते आपल्या ठाम निर्णयांसाठी ओळखले जातात. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर 2022 ते 10 नोव्हेंबर 2024 म्हणजे दोन वर्षांचा असेल.

 

Back to top button