बीड : सात हजारांची लाच घेताना तलाठी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात | पुढारी

बीड : सात हजारांची लाच घेताना तलाठी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

अंबाजोगाई; पुढारी वृत्तसेवा : सात-बारा उतार्‍यामध्ये फेरफार करण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच घेताना तलाठ्यासह एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. प्रफुल्ल (विक्की) सुहासराव आरबाड (वय ३०, रा. प्रशांतनगर, अंबाजोगाई) असे लाचखोर तलाठ्याचे नाव असून, नजीरखान उमरद राजखान पठाण (वय 43, रा. फ्लॉवर्स क्वार्टर, अंबाजोगाई) असे खासगी व्यक्तीचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदाराने खरेदी केलेल्या प्लॉटची सातबारा उतार्‍यात फेरफार नोंद करण्यासाठी तलाठ्याकडे कागदपत्रे सादर केली. टॅक्स पावती न देता सातबारा फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी प्रफुल्ल आरबाड यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर सोमवारी (दि.26) बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. तलाठी आरबाड व नजीरखान यांना अंबाजोगाईतील एका बिअर बारसमोर तक्रारदाराकडून सात हजार रुपयांची लाच घेताना पकडले.

दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निरीक्षक अमोल धस, पोलीस अमंलदार भरत गारदे, अविनाश गवळी, संतोष राठोड, चालक गणेश मेहत्रे यांनी सापळा रचला होता.

हेही वाचा :

Back to top button