बीड : शनी मंदिर व पांचाळेश्वरचे दत्त मंदिर पुन्हा पाण्याखाली; ३२ गावांना सतर्कतेचा इशारा | पुढारी

बीड : शनी मंदिर व पांचाळेश्वरचे दत्त मंदिर पुन्हा पाण्याखाली; ३२ गावांना सतर्कतेचा इशारा

गेवराई (बीड) ; पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यात तसेच जायकवाडी पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणी साठा ९८.२४ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे शनिवार ( दि. १७ सप्टेंबर ) रोजी ४ वाजता धरणाचे १८ दरवाजे चार फुटाने उंचावून १ लाख १३ हजार १८४ क्युसेकने गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी नदी पात्रात १ लाख १६ हजार क्युसेकपर्यंत पाणीपातळी आहे. मात्र, जायकवाडी पाटबंधारेकडून गोदावरी नदी पात्रातील विसर्ग वाढण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहेत. तसेच गोदाकाठच्या ग्रामस्थांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे.

अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो झाल्यानंतर वरील धरणाचे पाणी जायकवाडी धरणाकडे येत आहे. त्यातच धरण पाणलोट क्षेत्रात व नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी जास्त होत असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत आहे. शनिवार रोजी चार वाजता १० ते २७ असे एकूण १८ दरवाजे चार फूट उघडून धरण सांडव्याव्दारे १ लाख १३ हजार १८४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक तसेच जायकवाडी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

गोदावरी नदी पात्रात १ लाख १६ हजार क्यूसेक पाणीपातळी आहे; परंतु, जायकवाडी प्रकल्पातून १ लाख २५ हजार ते दीड लाख क्यूसेक पाणी सोडण्याची शक्यता असल्याने गोदाकाठच्या गावाला पाण्याचा विळखा पडणार आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत होणार असून, महसूल प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाणार आहे. दरम्यान, राक्षभुवन व पंचाळेश्वर येथील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. या दरम्यान अधिक पाणी सोडल्यास गोदाकाठच्या गंगावाडी, राजापूर या गावाला पुराचा वेढा पडण्याची शक्यता आहे. तहसीलदार सचिन खाडे यांनी गोदाकाठच्या गावातील नागरिकांनी गोदापात्रात जावू नये, तसेच पाळीव पशुधनाची देखील काळजी घ्यावी व गोदापत्रातील वाढती पाणी पातळी पाहता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बत्तीस गावांना दिला सतर्कतेचा इशारा

आगरनांदुर, संगमजळगाव, हिंगणगाव, गोंदी खु., कटचिंचोली, पांगुळगाव, सुरळेगाव, पांचाळेश्वर, राक्षसभुवन, म्हाळसपिंपळगाव, सावळेश्वर, खामगाव, राजापुर, गंगावाडी, काठोडा, नागझरी, राहेरी, बोरगावथडी, भोगलगाव, पांढरी, मिरगांव, तपेनिमगांव, ढालेगाव, श्रीपत अंतरवाला, गोपत पिंपळगाव, रामपुरी, मनुबाई जवळा, गुळज (भगवाननगर), पाथरवाला बु., गुंतेगाव, पाथरवाला खु., बोरगाव बु. या बत्तीस गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला.

हेही वाचलंत का?  

Back to top button