राजूरचे मतदार कुणाला देणार कौल? आज होत असलेल्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष ! | पुढारी

राजूरचे मतदार कुणाला देणार कौल? आज होत असलेल्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष !

अकोले : पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जुन्या इमारतीत असलेल्या राजूर ग्रामपंचायतीने नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले आहे. गावात विकास कामांसह अनेक शासकीय योजनांची वाणवा आजही प्रकर्षाने राजूरकरांना जाणवत आहे. या बिकट पार्श्वभूमीवर आज (दि.18) रोजी मतदानाच्या रुपाने मतदान करुन ग्रामपंचायत निवडणुकीत राजूरकर नेमकं कुणाच्या विजयाचा कौल देतात, याकडे अकोले तालुक्याचे लक्ष लागले आहे.  दिवासी विभागाचे केंद्रबिंदू असलेल्या राजूरची लोकसंख्या 10 हजार 46 आहे. 17 ग्रा. पं. सदस्य आहेत. अनेक वर्षांपासून जुन्या इमारतीत या ग्रामपंचायतीचा कारभार चालतो. इमारतीच्या छतावर पावसाळ्यात दरवर्षी गवत उगवते अन् उन्हाळ्यात ते जळून जाते. ही परंपरा अनेक वर्षांपासून राजूरकर उघड्या डोळ्याने पाहत आहेत. पण, नेते, पुढारी, कार्यकर्ते कोणतीच भूमिका घेताना दिसत नाहीत. गावातील राजकीय जिरवा- जिरवीच्या राजकारणामुळे ग्रामसेवक जास्त दिवस टिकत नाहीत.

त्यामुळे दोन डझनभर ग्रामसेवकांनी राजूर ग्रामपंचायतचा कारभार बघितल्याची दप्तरी नोंद आहे. आदिवासी विभागाचे केंद्रबिंदू असलेल्या राजूर गावात पिण्यासाठी पाणी, कचरा व्यवस्थापन, शौचालय, रस्ते, गटारी आदी प्रश्न राजूरकरांच्या जणू पाचवीलाच पुजले आहेत. बसस्थानक आहे, पण पिण्यासाठी पाणीनाही. निवार्‍यासाठी प्रवाशांना व्यवस्थाच नाही. परिसरातील सुमारे 80 ते 90 गावे, वाड्या- वस्त्यांतील लोक बाजारसाठी सोमवारी तर कधी अधून-मधून येतात. परंतु, रस्त्यावरच बाजार भरत असल्याने पावसाळ्यात गर्दीत बाजारकरूंना बाजार करावा लागतो. बाजारतळ नाही, मात्र व्यापार्‍यांकडून कर न चुकता घेतला जातो.

कचराकुंड्या आहेत, पण कचर्‍याने भरलेल्या या कुंड्यांची तीन-चार दिवस स्वच्छता होत नाही. परंतु, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, मर्जीतले कार्यकर्ते व पुढार्‍यांनाच ग्रामपंचायतीच्या सोयी-सुविधांचा लाभ मिळतो. परिणामी येथील नोकर व काही रहिवासी अकोले व कोतूळला राहणे पसंत करतात. काही ठेकेदारांनी राजूरमध्ये छोटी-मोठी कामे केली. मात्र, कामाला दर्जाच नाही, अशी वास्तुस्थिती राजूरकर उघड्या डोळ्यांनी पाहतात. गावठाण जागेवर अनेक अतिक्रमणे झाली. मात्र, आवाज उठवल्यास साम, दाम, दंड भेदाचा वापर होतो. त्यामुळे ‘तेरी भी चुप और मेरी भी चुप’ अशी भूमिका घेत असून, या पार्श्वभूमीवर होणार्‍या या मतदानाकडे लक्ष लागले आहे.

दारुबंदी विषयी भूमिका महत्त्वाची..!
राजूरमधील जनतेने लढा उभारून दारुबंदी घडविली. पण, खुलेआम दारू विकली जात आहे. आता ग्रामपंचायत उमेदवारांनी राजूरमध्ये दारू थांबविण्याबाबत प्रतिज्ञापत्रावर आपली भूमिका जाहीर करावी. जनतेने अशाच उमेदवारांनाच मतदान करावे, असे आवाहन दारुबंदी आंदोलन कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, नीलेश तळेकर, संतोष मुर्तडक, गौराम बिडवे यांनी केले आहे. वैभव पिचड व आ. डॉ. किरण लहामटे यांनी सत्ता आल्यास यावर काय करणार, हे सांगावे, असे ते म्हणाले.

Back to top button