

समुद्रवाणी; पुढारी वृत्तसेवा : उस्मानाबाद तालुक्यातील दारफळ येथे मासे व खेकडे पकडण्यासाठी पाच तरुण गेले होते. त्यापैकी एक जणाचा पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (दि.१३) दुपारी १२च्या सुमारास घडली.
याबाबत अधिक वृत्त असे की, विकास कुऱ्हाडे, सचिन धोत्रे, तिम्मा धोत्रे, राहुल धोत्रे व मारुती धोत्रे हे युवक दारफळ येथे राजगोवी नदीमध्ये बाराच्या सुमारास मासेमारी व खेकडा पकडण्यासाठी गेले होते. यावेळी मारुती दशरथ धोत्रे (वय १८ रा. गावसुद, जिल्हा लातूर) याचा बुडून मृत्यू झाला.
यावेळी उस्मानाबादकडे दारफळचे ग्रामसेवक सतीश शिंदे जात होते. त्यांनी या घटनेची माहिती सरपंच संजय भोरे यांना फोनवरून दिली. सरपंच यांनी तत्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून ही माहिती सर्वत्र कळवली.
त्यानंतर सुनील भुतेकर, सतीस घुटे, पांडुरंग ओव्हाळ, गुलाब घुटे, शशिकांत इंगळे, श्रीधर सुरवसे आदित्य धवन यांनी जिवाची पर्वा न करता पाण्यात उड्या घेऊन या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा शोध लागला नाही.
सरपंच, तलाठी व पाडोळी दुरक्षेत्रचे पोलीस प कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. आमदार कैलास पाटील यांनी तहसीलदारांना फोन केल्यानंतर एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यात आला. पोलीस हवालदार नवनाथ बांगर, गणेश सर्जे यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
हेही वाचलंत का ?