परभणी: गोदावरी नदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा | पुढारी

परभणी: गोदावरी नदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाल्याने दक्षिण काशी म्हणून ओळख असलेली गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे पात्रातील सर्व छोटी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान, प्रशासनाने गोदाकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मागील काही दिवसांत १८ ते २१ दिवसांचा पावसाचा खंड पडल्यानंतर शेतकरी बळीराजा संकटात सापडला होता. परंतु, मागच्या २ ते ३ दिवसांत परतीच्या पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावल्याने गोदावरी नदीलाही पूर आला आहे. मराठवाड्यात सर्वदूर पाऊस झाल्यामुळे जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

तालुक्यातील अनेक भागांमधून गोदावरी नदीचे पात्र वाहते. सद्यस्थितीत गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे शहरातील गोदापात्रातील तुळतुंब मंदिराशेजारील पाच देऊळे, मारुतीचे जोड मंदिर, छोटे मारुती मंदिर, बोंबल्या गणपती, चपट्या गणपती, मुरलीधर मंदिर यातील काही ऐतिहासिक व पुरातन मंदिरे बुडाली आहेत. तर काही बुडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच गोदापात्रातील सर्वात मोठे नृसिंह (नरशा) मंदिरालाही पाण्याने वेढा घातला आहे. तसेच तालुक्यात सर्वदूर पाऊस झाल्यामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button