

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील नाथसागर धरणामध्ये सलग दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असून ९८.७९ भरलेल्या धरणाचे १८ दरवाजे चार फूट खुले करण्यात आले. शनिवारी (दि.१०) सकाळी आठ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीत ७६ हजार ५५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. दरम्यान वरील धरणातून येणाऱ्या ६५ हजाराहून अधिक पाण्याची आवक जमा होत आहे.
शनिवारी दिवसभर नाथसागर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे पाण्याची आवक सुरू होती. येणाऱ्या पाण्यामुळे धरणाची एकूण पाणी पातळी २८८२.७७१ दलघमी झाली आहे. शनिवारी रोजी धरणाचे अठरा दरवाजे चार फूट खुले ठेवून गोदावरी नदीत ७६ हजार क्युसेक वाढविण्याचा निर्णय धरण शाखा अभियंता विजय काकडे यांनी घेतला. शनिवारी सकाळी आठच्या सुमारास नियंत्रण कक्षात नोंद केल्यानुसार वरील धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक ६५ हजाराहून अधिक जमा होत होती. त्यामुळे उजव्या कालव्यासह पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरी नदी दुधडी भरून वाहत आहे.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पाणी वाटप नियोजन समिती व पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत नाथसागर धरणामधील जमा झालेल्या पाणी साठ्याचे नियोजन ठरले होते. गोदावरी नदीची पाणी वाहन क्षमता १ लाख २५ हजार असताना पाण्याचा विसर्ग करण्यासाठी येथील अधिकाऱ्यांकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप पाणी तज्ञांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळाचे अर्धा डझन मंत्र्याच्या दौऱ्यावेळी त्यांना धरणातील पाणी दाखविण्यासाठी राखीव ठेवल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
हेही वाचा :