हिंगोली : कळमनुरी येथे भर चौकात ग्रामपंचायत सदस्य पतीचा गळा चिरुन खून | पुढारी

हिंगोली : कळमनुरी येथे भर चौकात ग्रामपंचायत सदस्य पतीचा गळा चिरुन खून

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : पुढारी वृत्तसेवा : शेवाळा तालुका कळमनुरी येथे नाका म्हणून ओळख असणाऱ्या भर चौकात ग्रामपंचायत सदस्य पतीचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे. या सदस्याचा हॉटेलमध्ये गळा कापल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना १ सप्टेंबर गुरुवार सकाळी १० वाजता एका हॉटेलमध्ये घडली. मारेकरी हा पंचवीस वर्षाचा तरुण असून त्याने खून केल्यानंतर रक्ताने माखलेले हात बाजूच्या हॉटेलमध्ये धुतल्याचे समजले. ही बाब लगेच पोलिसांना कळविण्यात आल्याने आरोपीला आखाडा बाळापूर पोलिस हजर झाले. त्याला ताब्यात घेतल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

शेवाळा तालुका कळमनुरी येथे ग्रामपंचायत सदस्य पंचाबाई यांचे पती गौतम धोंडबा नरवाडे (वय ५०) हे नाक्यावरील एका हॉटेलमध्ये चहापाणी घेत बसले होते. मारेकरी हा खिशातून धारदार शस्त्र घेऊन हॉटेलमध्ये आला. आल्या आल्या त्याने लगेच गौतम नरवाडे यांच्या गळ्यावर धारदार शस्त्र फिरविले. त्यावेळी गळा बऱ्याच मोठ्या प्रमाणात कापला गेल्याने गौतम यांचा मृत्यू जागीच झाल्याचे दृश्य पाहणाऱ्या नागरिकांच्या चर्चेवरून समजले.

मारणारा तरुण पुणे, औरंगाबाद येथे मिस्त्री म्हणून काम करत होता. तो काही दिवसांपूर्वी शेवाळा येथे आला होता. आरोपीचे नाव मुस्तफा जीलानी (वय २५, रा. शेवाळा) असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्याला आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेवाळा येथून ताब्यात घेतले.

याबाबत येथील काही प्रतिष्ठित नागरिकांनी अशी प्रतिक्रिया दिली की, शेवाळा गाव हे मोठ्या लोकसंख्येचे असल्याने येथे पोलीस चौकी असणे अत्यंत आवश्यक आहे. अशा घटना यापूर्वी दोन वेळेस यंदाच्या वर्षात झाल्याचे पोलीस रेकॉर्डला आहे.

घटनास्थळी डीवायएसपी किशोर कांबळे हे भेट देणार असल्याचे समजले आहे. पुढील तपास डीवायएसपी वसमत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पीसी बोधनापोड, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे व बीट जमादार नागोराव बाबळे, पोलीस राजू जाधव, राजू जमदाडे हे करीत आहेत . गौतम नरवाडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

Back to top button