उस्मानाबाद : भुईकोट किल्ल्यातील प्राचीन असलेली गणेश मूर्ती जीर्ण | पुढारी

उस्मानाबाद : भुईकोट किल्ल्यातील प्राचीन असलेली गणेश मूर्ती जीर्ण

परंडा ( उस्मानाबाद ) : आशुतोष बनसोडे; ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील प्राचीन असलेली गणेश मूर्ती जीर्ण होत असून याकडे पुरातत्व खात्याचे लक्ष नसल्याने ती नामशेष होण्याच्या मार्गवर असल्याचे इतिहास अभ्यासक सांगत आहेत. यासाठी याकडे लक्ष देऊन त्यासाठी किल्ल्यात संग्रहालय बांधून त्यात जतन करण्याची मागणी जोर धरत आहे.

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात ज्ञानेश्वरी ग्रंथात पहिल्या अध्यायात सहा हात असलेल्या गणेश मूर्तीचे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णन केलेले आहे. ती श्री. गणेशाची मूर्ती किल्ल्याच्या मशिदीच्या मागील बाजूस असलेल्या हमाम खान्यात ठेवण्यात आली आहे. भुईकोट किल्ल्यात असणारी श्री. गणेशाची व इतर देवतांच्या प्राचीन मूर्ती किल्ल्याच्या खोदकाम करताना सापडल्या. पण सध्या या मूर्ती अत्यंत दुर्लक्षित व जीर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचे जतन करणे हे पुरातत्व विभागाचे काम आहे. मात्र, तरीही त्यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील हा एक अनमोल ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

किल्ल्यातील अनेक भागातील इतिहासाचा महत्त्वाचा संदर्भ दुर्लक्षित आहे. मात्र, आहे त्या प्राचीन अवशेषांचे जतन पुरातत्त्व खात्यातर्फे व्हावे, अशी मागणी इतिहास अभ्यासकांकडून होत आहे. किल्ल्यातील उपलब्ध असलेल्या प्रत्येक राजवटीच्या अवशेषांचे त्याच मूळ जागेवर पुरातत्त्वीय दृष्टीने संवर्धन केल्यास त्या जागेचे, घटनांचे मूळ सत्य शोधण्यास व संशोधन करण्यास नक्की मदत होईल. काही वर्षांपूर्वी खोदकाम करताना असंख्य मूर्तींचे अवशेष एकत्र ठेवण्यात आले आहेत. या मूर्ती अभ्यासकांसाठी खुल्या करण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचलंत का?  

परंडा किल्ल्यातील हमाम खान्यात ठेवलेल्या आणि किल्ल्यामध्ये मिळालेल्या देवदेवतांच्या मूर्तीचे शास्त्रीय पद्धतीने जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे. या मूर्तीची काही प्रमाणात झीज झालेली आहे. यामूर्ती जास्त खराब होऊ नयेत यासाठी यावर योग्य ती प्रक्रिया करून त्यांच्यासाठी किल्ल्यात एक संग्रहालय बांधण्याची आवश्यकता आहे.
डॉ. सचिन जोशी, पुरातत्त्व अभ्यासक (डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, पुणे )

Back to top button