नांदेड : कलाध्यापक बालाजी पेटेकरांनी बनविलेला पर्यावरण पूरक गणपती ठरतोय अनेकांचे आकर्षण

नांदेड : कलाध्यापक बालाजी पेटेकरांनी बनविलेला पर्यावरण पूरक गणपती ठरतोय अनेकांचे आकर्षण

नरसीफाटा; सय्यद जाफर : येथील शिवशंकर विद्यालयाचे (वन्नाळी, ता. देगलूर) कलाध्यापक, बालाजी पेटेकर यांनी बॉम्बे मातीपासून बनवलेली पर्यावरण पूरक गणपतीची मूर्ती अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. असे म्हटले जाते की, काळानुरुप जो बदलतो तोच आजच्या जगात टिकतो. काही जुन्या परंपरा आजही काही ठिकाणी पहायला मिळत आहेत. पूर्वी गणपती उत्सव आला की, घरातील वडीलधारी मंडळी नदी काठच्या गाळाच्या मातीपासून गणपती बनवायचे. यातून येणा-या नव्या पिढीला नकळत कलेचे धडे घरातुनच मिळायचे. पण ते आज घडत नाही म्हणून पर्यावरण पूरक गणपती ही आजकाल काळाची गरज बनली आहे. याचं भान आणि याची जान राखून श्री शिवशंकर विद्यालय वन्नाळी (ता. देगलूर) येथील कलाध्यापक, बालाजी पेटेकर यांनी बॉम्बे मातीपासून पर्यावरण पूरक गणेशमूर्ती साकारली आहे. ही गणरायाची मूर्ती अनेकांचे आकर्षण ठरत आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा केमिकलयुक्त रंगाचा वापर करून गणेश मूर्ती करणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक आहे. याऐवजी बॉम्बे, शाडूच्या मातीपासून किंवा कागदाच्या लगद्यापासून बनवले तर ते पर्यावरणाला पूरक ठरतील. यापासून मुर्ती बनवतांना विद्यार्थ्यांना एक वेगळाच आनंद मिळतो. यातूनच उद्याचा एखादा कलावंत, मूर्तिकारही जन्माला येऊ शकतो. हाच दृष्टिकोन ठेवून आपल्या कृतीतून कलाध्यापक बालाजी पेटेकर यांनी आपला विचार देखील रूजवला आहे.

कलाध्यापक बालाजी पेटेकर यांनी यापूर्वी साबणापासून मूर्तीही बनवल्या आहेत. खडूपासून मुर्ती बनवून त्यांनी अनेकांचे लक्षही वेधले होते. एक मनस्वी चित्रकार, ग्रामीण कवी, कथाकार, गायक, गीतकार, रांगोळीकार, चित्रपट कलावंत, मिमीक्री आर्टीस्ट म्हणून ते सर्वत्र प्रसिद्ध आहेत. यापूर्वी अनेक शाळात आणि विविध ठिकाणी त्यांनी मातीपासून मूर्त्या बनवण्याच्या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन त्यांनी केले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news