पिंपरी : दीड दिवसाच्या गणरायाला निरोप | पुढारी

पिंपरी : दीड दिवसाच्या गणरायाला निरोप

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : गणपती बाप्पा मोरयाऽ, पुढच्या वर्षी लवकर याऽऽ’ अशी भावनिक साद घालून पिंपरी चिंचवड शहरातील भाविकांनी दीड दिवसाच्या गणरायाला निरोप दिला. सायंकाळी पाचनंतर चिंचवडगावातील मोरया गोसावी, केशवनगर, थेरगाव यांसह पिंपरीतील झुलेलाल घाटावर घरगुती मूर्ती विसर्जनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तर सामाजिक संस्थतर्फे पर्यावरण संवर्धनासाठी मूर्तिदान कार्यक्रमही घेण्यात आला. त्यास नागरिकांचा प्रतिसाद लाभला. विसर्जनापूर्वी भाविकांनी विधिवत गणेशाची आरती करून नैवेद्य देऊन गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेतर्फे शहरातील घाटांची स्वच्छता करण्यात आली होती. सर्वच घाटांवर जीवरक्षक तैनात असून, सुरक्षाव्यवस्था ठेवलेली आहे. गणेशोत्सवापूर्वी आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील सर्व घाटांचा पाहणी दौरा करून गणेश विसर्जन घाटांवर दिशादर्शक व स्थळदर्शक फलक लावण्यात यावे, विसर्जन घाटांवरील निर्माल्य कुंडांचे ठिकाणे निश्चित करून तसे फलक लावावेत. जीवरक्षकांची नेमणूक करून मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी समन्वय साधावे, अग्निशमन यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित ठेवावी, नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, विसर्जन घाटांवर सुशोभीकरण करण्यात यावे, अशा सूचना केल्या होत्या.

शहरातील घाटांवर मंडप टाकून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. घाटावर प्रकाश दिवे, कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मोरया गोसावी घाटाजवळ बोट ठेवण्यात आली होती.

Back to top button