औरंगाबाद : पुलाअभावी चिखलठाण येथील विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास | पुढारी

औरंगाबाद : पुलाअभावी चिखलठाण येथील विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास

कन्नड: पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील चिखलठाण येथील विद्यार्थ्यांना नदीवर पूल नसल्याने लाकडी दांडीचा आधार घेऊन जीवघेणा प्रवास करून शाळेत जावे लागत आहे. चिखलठाण गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. या गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर कन्नड व खुलताबाद तालुक्याच्या सीमेवरील शेतात १२ मुली व १८ मुले राहतात. त्यांना शाळेत येताना रस्त्यात गांधारी नदी लागते. या नदीवर पूल नसल्याने व सध्या नदीला पाणी असल्याने या विद्यार्थांना जीव मुठीत धरून लाकडाच्या दांडीला धरून नदी पार करावी लागते.

मागील महिन्यात सतत झालेल्या पावसाने गांधारी नदीला कमी अधिक प्रमाणात पाणी असल्याने पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. नदीचे पात्र पार करण्यासाठी मुलांचे पालक दोन्ही बाजूला उभे राहतात. एक लाकडी लांब दांडी खांद्यावर धरतात. याच लाकडी दांडीला लटकून हे विद्यार्थी नदीचे पात्र पार करून शाळेत येतात.

शिवराजच्या इंग्रजी संभाषणाने सिद्ध केली जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता

शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील पालक आपल्या मुलांना खासगी शाळेत मोठी फी भरून प्रवेश घेतात. यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळा विद्यार्थी संख्येअभावी ओस पडत आहे. या शाळेत फक्त गरीब शेतकरी, मजूर, अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबाचीच मुले शिक्षण घेताना दिसत आहेत. लाकडी दांडीला लटकून जीवघेण्या खडतर प्रवास करणाऱ्या शिवराज प्रमोद चव्हाण या इयत्ता सहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना थेट इंग्रजीतून रस्त्याची समस्याबाबत प्रतिक्रिया दिली. यातून त्यांने जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षणाची गुणवत्ता सिद्ध करून दिली आहे.

ग्रामीण भागातील चिखलठाण येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेण्याऱ्या या गुणवंत विद्यार्थ्यांना मात्र नदीवर पूल नसल्याची झळ बसत आहे. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना १५ ऑगस्टरोजी सकाळीच प्रभातफेरी व ध्वजारोहण करिता अंधारात हेच विद्यार्थी शाळेत कसे आले असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी गांधारी नदीवर चांगला पूल करण्यात यावा, अशी मागणी पालकांमधून हाेत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button