(Video) बीड : पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची गर्दी

(Video) बीड : पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची गर्दी

परळी वैजनाथ; रविंद्र जोशी : बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ मंदिरात आज पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली. कोरोना काळामध्ये सलग दोन वर्षे श्रावण महिन्यात भाविकांना वैजनाथाचे दर्शन घेता आले नव्हते. आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

'हर हर महादेव'चा जयघोष करत परळी येथील वैजनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने आज मंदिर परिसर फलून गेला. पहिल्याच श्रावणी सोमवार निमित्ताने वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात यासह अन्य राज्यातील भाविक वैजनाथाच्या दर्शनासाठी परळीत  दाखल झाले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर परिसरात सुमारे ८० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक वैजनाथ मंदिर

परळी वैजनाथ येथील वैजनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत मानले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्‍या व भव्य प्रवेशद्वार लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते.  मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. बीडपासून परळी वैजनाथ सुमारे ९० किलोमीटर अंतरावर आहे.

वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्यावतीने भाविकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मंदिराच्या उत्तर पायऱ्यांवर लोखंडी बॅरीकेट लावण्यात आले आहेत. तसेच महिलांसाठी दर्शन रागांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना श्रीं चे दर्शन सुलभपणे व्हावे यासाठी वैजनाथ देवस्थानकडून सर्व तयारी करण्यात आली आहे.
– राजेश देशमुख, विश्वस्त, वैद्यनाथ मंदिर

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news