

बीजिंग : चीनचे 'लाँग मार्च 5 बी' हे रॉकेट नियंत्रित होऊन अंतराळातून शनिवारी रात्री मलेशियानजीकच्या हिंद महासागरात कोसळले. तीन वर्षांत तिसर्यांदा चीनचे रॉकेट पृथ्वीवर कोसळले.
अवघ्या आठवडाभरापूर्वी खगोलशास्त्रज्ञांनी चीनचे एक रॉकेट अनियंत्रित होऊन पृथ्वीवर कोसळेल, असा अंदाज व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरला आणि 'लाँग मार्च 5 बी ' हे रॉकेट हिंद महासागरात कोसळले. अनियंत्रित होऊन कोसळण्यापूर्वी अवकाशात आतषबाजी केल्यासारखे दृश्य दिसत होते. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. मलेशियाच्या कुचिंग शहरातून कोसळणार्या चिनी रॉकेटचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
चीनकडून 24 जुलै 2022 रोजी 'लाँग मार्च 5 बी' रॉकेट प्रक्षेपित करण्यात आले होते. या रॉकेटने चिनी अंतराळ यानाचा एका भाग अवकाशात पोहोचविला होता. त्यानंतर चीनने या रॉकेटवरील आपले नियंत्रण गमावले. शेवटी ते शनिवारी रात्री मलेशियानजीकच्या हिंद महासागरात कोसळले.
गेल्या तीन वर्षांत चीनबाबत अशी घटना तिसर्यांदा घडली आहे. चिनी रॉकेट अंतराळात नियंत्रितपणे जातात; पण ते पृथ्वीवर परत येत असताना चीन त्यावरील नियंत्रण गमावतो. यासंदर्भात प्रत्येकवेळी चीन म्हणतो की, नियंत्रण गमावल्यानंतर त्या रॉकेटना पुन्हा त्यांना नियंत्रित करून आम्ही पाण्यात पाडण्याचा प्रयत्न करत करतो; मात्र शेवटच्या क्षणी ते शक्य होत नाही.
2020 मध्ये चीनने पहिले अनियंत्रित रॉकेट प. आफ्रिकेनजीक अटलांटिक महासागरात कोसळले होते. मे 2021 मध्ये दुसरे रॉकेट मालदिवच्या समुद्रात कोसळले होते.