परभणी : चारठाणा जिल्हा परिषद गट खुला ; भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीत चुरस | पुढारी

परभणी : चारठाणा जिल्हा परिषद गट खुला ; भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीत चुरस

चारठाणा; सय्यद मुजीब अहमद : जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी आरक्षण सोडत गुरुवारी (दि.28) जाहीर करण्यात आली. चारठाणा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण पुरुषाला, तर पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलासाठी राखीव आहे. त्यामुळे चारठाणा जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये इच्छुकांमध्ये मोठी चुरस राहिल अशी शक्यता आहे.  भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी नानासाहेब राऊत, राष्ट्रवादीकडून शंकर जाधव तर भाजपकडून ऐनवेळेस कोणता उमेदवार दिला जातोय याकडे सर्व तालुक्याचे लक्ष असेल.

आमदार विजय भांबळे यांनी चारठाणा परिसरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केल्यामुळे जिल्हा परिषद गटामध्ये त्यांचा उमेदवार निवडून येणार असल्याचे चित्र आहे. गेल्या पंधरा वर्षापासून जिल्हा परिषदेला मीना राऊत निवडून येत आहेत. परंतु, मतदार त्यांना पुन्हा निवडून देणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चारठाणा गट हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो; परंतु ऐनवेळी नानासाहेब राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

जिंतूर तालुक्यात काँग्रेस नावालाही नव्हती. परंतु, सुरेश नागरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून जिंतूर तालुक्यात काँग्रेसचे जाळे पसरविले आहे.  जिल्हा परिषद गटामध्ये भाजपकडे उमेदवार नसल्याने त्यांना तगडा उमेदवार शोधावा लागणार आहे. राष्ट्रवादीकडून माजी आमदार भांबळे यांनी शंकर जाधव यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवल्याने जाधव यांनी तयारी सुरू केली आहे.

पंचायत समिती गणामध्ये भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार आहे. राष्ट्रवादीकडून सलीम उद्दीन काजी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. काँग्रेसकडून तहसीन देशमुख यांचे नाव आघाडीवर आहे. जिल्हा परिषद गटासाठी भाजपसाठी ऐनवेळी चारठाणा येथील सरपंच अनिरुद्ध चव्हाण यांचे नाव पुढे येणार असल्याचे बोलले जात आहे. तर पंचायत समिती चारठाणा गणातून भाजपकडून अथर काजी यांचे नाव पुढे येत आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button