बीड : सुनेला जाळून मारले; सासू-सासऱ्याला आजन्म कारावासाची शिक्षा | पुढारी

बीड : सुनेला जाळून मारले; सासू-सासऱ्याला आजन्म कारावासाची शिक्षा

अंबाजोगाई पुढारी वृत्तसेवा :  सुनेला रॉकेल टाकुन पेटवून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सासु-सासऱ्यास आजीवन कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डी. खोचे यांनी बुधवारी ठोठावली. रतन राजाराम कसबे व नंदुबाई रतन कसबे (रा.उंबरी ता. केज) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

या घटनेची माहिती अशी की, सोनाली विकास कसबे हिचा विवाह ९ महिन्यापूर्वी विकास रतन कसबे याच्याशी झाला होता. लग्नानंतर सासरा रतन व सासु नंदुबाई हे सतत सुन सोनाली हिच्याशी विविध कारणे काढुन भांडत असत. सततच्या भांडणामुळे सोनाली घटनेच्या दीड महिन्यापासून माहेरी गेली होती. मात्र घटनेच्या आठ ते दहा दिवस अगोदर सोनाली हिस तिचे वडिलांनी सासरी आणून सोडले होते. दि. ७ जून २०१८ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सोनाली ही झोपेतून उशिराने उठली. या कारणावरून सासरा रतन व सासु नंदुबाई हे तिच्याशी भांडू लागले. तेवढयात सासु नंदुबाई हिने सोनाली हिच्या अंगावर रॉकेल टाकले व सासरा रतन याने काडी ओढून पेटवून दिले. या दुर्घटनेत सोनाली गंभीररित्या भाजली.

तिला उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तिचा पोलीस व प्रशासन यांनी मृत्यूपूर्वी जवाब नोंदविला. ती ९४ टक्के भाजल्याने तिचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. सोनाली हिच्या जवाबानुसार केज पोलीस ठाण्यात सासरा रतन राजाराम कसबे व सासु नंदुबाई रतन कसबे (रा.उंबरी) यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला होता.

या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली व आरोपीविरुद्ध दोषारोप दाखल केले. हे प्रकरण सुनावणीसाठी अंबाजोगाई येथील अप्पर सत्र न्यायाधीश डी.डी.खोचे यांच्या न्यायालयासमोर सुनावणीसाठी आले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. लक्ष्मण फड यांनी सात साक्षीदार तपासले. न्यायालयाने सदर साक्षीपुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस आजीवन कारावासाची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रूपये दंड ठोठावला.

हेही वाचलंत का?

Back to top button