हिंगोली : जवाहर नवोदय विद्यालयाच्या एनसीसी युनिटमध्ये मुलींनाही प्रवेश | पुढारी

हिंगोली : जवाहर नवोदय विद्यालयाच्या एनसीसी युनिटमध्ये मुलींनाही प्रवेश

वसमत; पुढारी वृत्तसेवा : वसमतनगर (जि. हिंगोली) येथील जवाहर नवोदय विद्यालयात बुधवारी (दि. २६) एन. सी. सी. युनिटसाठी प्रवेश प्रक्रिया पार पडली. दरवर्षी एन.सी.सी. च्या पॉलिसीनुसार केवळ मुलांचीच भरती करण्यात येत होती. परंतु यावर्षी चालू शैक्षणिक वर्षात ३० रिक्त जागांपैकी १२ मुलींना एन.सी.सी. च्या प्रथम वर्षात प्रवेश देण्यात आला, अशी माहिती नवोदय विद्यालयाचे ए.एन.ओ सोपान सावळे आणि प्राचार्य गंगाराम भरांडे यांनी दिली.

५२ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. नांदेडचे कमांडिंग ऑफिसर रंगाराव यांनी एकूण रिक्त जागांच्या ३३ ते ४० टक्के मुलींना प्रवेश देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुलींच्या निवड प्रक्रियेसाठी ५२ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. नांदेड येथून सुभेदार विश्वनाथ चौगुले तसेच नायक अरविंद कुमार यांना विद्यालयात पाचारण केले होते. त्यांनी इच्छुक मुला-मुलींचे शारीरिक आरोग्य, फिटनेस तपासणी व इतर बाबी तपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. यावर्षी एन.सी.सी.च्या प्रथम वर्षात १८ मुले आणि १२ मुलींची अंतिम निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, ५२ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. नांदेडचे एडीएम ऑफिसर वेटरी वेलू यांनी जवाहर नवोदय विद्यालयाला भेट दिली आणि प्रवेश प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रकाच्या अनुषंगाने त्यांनी सांगितले की, एन.सी. सी. ‘अ ’ प्रमाणपत्र धारकास पोलीस निवड प्रक्रियेत २ टक्के बोनस गुण जाहीर केलेले आहेत. तसेच इतर ठिकाणी प्रवेशासाठी व नोकरीसाठी प्रमाणपत्र धारकास प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले.

एन.सी.सी.मध्ये मुलींना प्रवेश देण्याच्या निर्णयाचे पालकांनी समाधान व्यक्त केले. सोबतच जवाहर नवोदय विद्यालयाच्या एनसीसी युनिटच्या कार्यावरही अधिकार्‍यांनी समाधान व्यक्त केले. तसेच एएनओ सोपान सावळे तसेच प्राचार्य गंगाराम भरांडे यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

          हेही वाचलंत का?

 

Back to top button