व्हिडिओ : आजारी मुलाचा जीव वाचवण्यासाठी आईने काढला पुरातून मार्ग | पुढारी

व्हिडिओ : आजारी मुलाचा जीव वाचवण्यासाठी आईने काढला पुरातून मार्ग

बुलडाणा : पुढारी वृत्तसेवा : बुलडाणा जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाने अनेक नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. त्यातच मलकापूर तालुक्यातील काळेगाव या गावाचा संपर्क मलकापूरपासून तुटला आहे. गावाला चारही बाजूने विश्वगंगा नदीने वेढलेले आहे. तालुक्याला जाण्यासाठी केवळ हरसोडा मार्गे एकच रस्ता आहे. परंतु, याही रस्त्याचे पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावकऱ्यांना तूर्तास कुठेही येण्या-जाण्यात व्यत्यय येत आहे.

दरम्यान, गावातील वैशाली अंबादास काळे या महिलेचा देवांश नावाचा चिमुकला अचानक आजारी पडला. मात्र गावाला पुराचा वेढा असल्याने त्याला उपचारासाठी शहरातील दवाखान्यात न्यायचे कसे? असा यक्षप्रश्न काळे कुटुंबासमोर उभा पडला होता. अखेर चिमुकल्याच्या काळजीपोटी त्यांनी टायरवर बसून पुरातून आई आणि चिमुकल्याला उपचारासाठी नेले.

नदीच्या पाण्यातून ट्यूबटायरवर बसून जीव कसाबसा मुठीत धरत या महिलेने आपल्या चिमुकल्याला उपचारासाठी मलकापूर शहरात आणले. या आईच्या धाडसाचे कौतुक होत असून ट्यूबटायरवरून केलेल्या प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडिओ:

Back to top button