

पुणे, पुढारी वृत्तसेवा: गुंतवणुकीच्या बहाण्याने जादा परताव्याचे आमिष दाखवून 570 हून अधिक दिव्यांगांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आता सहा जणांना अटक करून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. दिव्यांगांना प्लेटिनियम इन्वेसमेंट अॅण्ड फायनान्स ग्लोबल सोल्युशन व सुयो अभिया एन्टरप्रायझेस या कंपनीत गुंतवणूक करून जादा परताव्याच्या बहाण्याने त्यांची फसवणूक केली होती.
अभिजर सैफुउद्दीन घोडनदीवाला (वय 32), प्रदीप महारूद्र कोलते (वय 29), सुयोग सुधीर मेहता (वय 33), चंचल सुयोग मेहता (वय 32), धनंजय सुदामराव जगताप (वय 39) आणि मिहिर संतोष गोखले ( वय 36), अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत झाली असून, त्यांचे दोन लॅपटॉप व सीपीयू, पाच हार्डडिक्स, आठ मोबाईल जप्त केले आहेत. तसेच त्यांची बँक खातीदेखील गोठविण्यात आली आहेत. गुन्ह्यातील फिर्यादी, आरोपी आणि साक्षीदार हे दिव्यांग आहेत. या तपासात 467 दिव्यांग साक्षीदारांशी संवाद साधून पुरावे गोळा करण्यात आले आहेत.
अशी झाली फसवणूक
आरोपींनी गुंतवणूकदारांना 45 ते 60 दिवसांत दुप्पट परताव्याचे आमिष दाखवले होते. याचा प्रचार करण्यासाठी त्यांनी पॅम्प्लेट, व्हिडीओ तयार करून त्यांना व्हॉट्सअपवर पाठवले होते. त्यानंतर त्यांच्याकडून स्वतःच्या व कंपनीच्या खात्यावर रकमा स्वीकारल्या होत्या. यामध्ये 570 जणांची फसवणूक झाली.