औरंगाबाद : इंदौर येथील बस अपघातात पाचोड येथील इसमाचा समावेश

पाचोड; पुढारी वृत्तसेवा : इंदौर येथील नर्मदा नदीच्या पुलावरून बस कोसळून झालेल्या दुर्गघटनेत पाचोड (ता.पैठण) येथील एक सत्तर वर्षीय इसमाचा समावेश आहे. मध्यप्रदेशमधील धार जिल्हयातील खलघाट् येथील बलकवाडा-खलटाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हि घटना घडली. सोमवारी (दि. १८) सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
मध्यप्रदेशमधील इंदौरहून अंमळनेरला राज्य परिवहन महामंडळाची बस येथे येत होती. मुसळधार पाऊस सुरू असल्याने अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस (एम.एच. ४० एन- ९८४८) पूल तोडून शंभर फूट खोल नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात १३ प्रवाशांना जलसमाधी मिळाली. तर १२ जणांना बाहेर काढून अन्य प्रवाशांचा शोध सुरु होता. या बसमध्ये साठ प्रवाशी होते. या मृतात पाचोड (ता.पैठण, जि. औरंगाबाद) येथील जगन्नाथ हेमराज जोशी (वय ७०) यांचा समावेश आहे.
जगन्नाथ जोशी हे मुळचे मल्लाडा (ता. सराडा, जि. उदयपूर) राजस्थान येथील रहीवाशी होते. ते चाळीस वर्षापासून पाचोड (ता. पैठण) येथे कुटुंबियांसमवेत वास्तव्यास होते. ते हॉटेल व्यवसाय करुन आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह चालवत हाेते. त्यांची येथे प्रामाणिक व कष्टाळू म्हणून पाचोडसह परिसरात ओळख होती. सहा जून रोजी त्यांचा वाढदिवस त्यांचा मुलगा प्रकाश जोशी यांनी मोठ्या थाटात साजरा केला हाेता. त्यानंतर ते पत्नीला सोडण्यासाठी मल्लाडा (राजस्थान) येथे गेले होते. पत्नीला गावी आई-वडिलांकडे सोडून ते परत पाचोड येथे येत असताना बसचा अचानक अपघात झाला. यात ते जागीच ठार झाले.
त्यांनी पाचोडला येत असताना बसमध्ये बसण्यापूर्वी मुलगा प्रकाश यास मोबाईलवरून आपण येत असल्याची कल्पना दिली होती. त्यांच्या मोबाईलवरून सकाळी साडेसात वाजता झालेले संभाषण हे अखेरचे संभाषण ठरले. मुलाने बसने येण्यास नकार दिल्यानंतरही त्यांनी या बसने प्रवास केला, अन् काळाने घाला घातला. या घटनेमुळे पाचोड परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. त्यांचा मृतदेह धार येथील रूग्णालयात ठेवण्यात आलेला असून मंगळवारी (दि. १९) त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सुभाष मेहता यांनी सांगीतले. त्यांच्या अपघाताचे वृत समजताच पाचोड येथील राजस्थानी व्यवसायीकांनी दुकाना बंद करून ते अंत्यविधीसाठी राजस्थान येथे गेले.
हेही वाचा
- चंद्रपूर : १५ तासानंतर पुरात अडकलेल्या शेतकऱ्यांना काढले सुखरूप बाहेर
- rohit chandel : काशीबाई बाजीराव बल्लाळ मालिकेच्या ‘बाजीराव’विषयी माहिती आहे का?
- Draupadi Murmu : गोव्यात मुख्यमंत्र्यांनी बजावला मतदानाचा हक्क ; द्रौपदी मुर्मू यांना मिळणार विरोधकांची मते?