Draupadi Murmu : गोव्यात मुख्यमंत्र्यांनी बजावला मतदानाचा हक्क ; द्रौपदी मुर्मू यांना मिळणार विरोधकांची मते? | पुढारी

Draupadi Murmu : गोव्यात मुख्यमंत्र्यांनी बजावला मतदानाचा हक्क ; द्रौपदी मुर्मू यांना मिळणार विरोधकांची मते?

पणजी : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज (दि. १८) गोव्यात मतदान झाले. पर्वरी येथील सचिवालयाच्या आवारात मतदान प्रक्रिया पार पडली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी तसेच सत्ताधारी व विरोधी पक्ष काँग्रेसच्या आमदारांनी आणि इतर पक्षाच्या आमदारांनी यावेळी मतदानामध्ये भाग घेतला. (Draupadi Murmu)

गोवा विधानसभेत भारतीय जनता पक्षाकडे २० आमदार आहेत. मगो पक्षाचे दोन व तीन अपक्ष अशा पंचवीस आमदारांचा भाजपाला पाठिंबा आहे. त्‍यांनी ‘एनडी’च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू  (Draupadi Murmu) यांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेस तथा विरोधी पक्षाकडे १५ आमदारांचा गट असला तरी त्यातील काही मते ही द्रौपदी मुर्मू यांना मिळण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनीही ‘एनडीए’च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना गोव्यामध्ये २५ पेक्षा जास्त आमदारांची मते मिळणार असल्याचे सांगितले आहे.

भाजपचे उत्तर गोवा खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर हे दिल्ली येथे मतदान करणार आहेत. दक्षिण गोवा काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी दिल्लीमध्ये मतदान करणार असल्याचे कळते. सर्वात पहिले मतदान वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी केले. त्यानंतर मुख्यमंत्री व इतर मंत्री आणि आमदारांनी मतदान केले. सध्या काँग्रेसमध्ये ज्या लाथाळ्या सुरू आहेत. त्याचा परिपाक म्हणून भाजप उमेदवार द्रौपदी मुरमू यांना विरोधी पक्षाकडून काही मते मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्‍यक्‍त हाेत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button