परभणी : पावसाच्या संततधारेने पिके पाण्याखाली, पिकांची वाढ खुंटली | पुढारी

परभणी : पावसाच्या संततधारेने पिके पाण्याखाली, पिकांची वाढ खुंटली

ताडकळस; पुढारी वृत्तसेवा; ताडकळस परिसरातील शिवारात मृग नक्षत्राचा पाऊस वेळेवर म्हणावा तसा झाला नाही. जून महिना तसा कोरडाच गेला. पावसाच्या हलक्या सरीवर शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने खरिपाची पेरणी आटोपली. पण त्यानंतर कित्येक दिवस पास झाला नाही. त्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पिके पाण्याखाली गेली आहेत. पिकांंमध्ये पाणी साचल्याने पिकांची वाढ खुंटली असून, येथील शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत.

शेतकऱ्याने शेतात महागडी खते, बी- बियाणांवर मोठा खर्च करत, पेरणी केली होती. यात कापूस, मूग, हळद पिकासोबत सोयाबीन या पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली. यानंतर पावसाच्या हलक्या सरी येत, ढगाळ वातावरणामुळे बियाणे उगवले. परंतु नंतर पाऊस तसा कमीच होत गेला आणि गेल्या पाच दिवसापासून ताडकळस परीसरातील कळगाव, बानेगाव, महागाव, फुलकळस, सिरकळस, धानोरा काळे, खाबेगाव शिवारात संततधार पावसाने पुन्हा हजेरी लावली. या सततच्या पावसाने शेतातील पीक पाण्याखाली गेले आहे.

गेले पाच दिवसांपासून सूर्यदर्शनही झाले नसल्याने पिकाची वाढदेखील खुंटली आहे. पिकात पाणी साचल्याने जास्तीचे पाणी बाहेर काढून देणे गरजेचे आहे. पाणी साचलेल्या ठिकाणी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने अशा ठिकाणी विद्यापीठ निर्मित बायोमिक्स औषधाची आळवणी किंवा फवारणी घेऊन उपायोजना कराव्यात अशी माहिती विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिली आहे.

चुनखडीयुक्त व पांढऱ्या जमिनीत सोयाबीन पिकात लोहाची (फेरस )कमतरता असल्यास प्रामुख्याने कोवळी पाने पिवळे होऊन शिरा हिरव्या दिसतात. अशा पिकातील हरितद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड – २ ( माईक्रोला) ५० मिली दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रमाण जास्त असल्यास आठ दिवसांनी पुन्हा फवारणी घेतल्यास अन्नद्रव्याची कमतरता कमी होऊन पीक वाढीस मदत होते आणि उत्त्पादनात वाढ होईल
डॉ.गजानन गडदे (व्यवस्थापक, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र ,व.ना. म. कृ.वी ,परभणी)

Back to top button