

धारूर, पुढारी वृत्तसेवाः दोन दुचाकींची वळणाच्या ठिकाणावर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकीवरील चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना धारूर-आसडोह रोडवर धारूर पासून तीन किमी अंतरावर मंगळवारी सकाळी घडली. या रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले असून खड्डा चुकवण्याच्या नादात अपघात होत आहेत.
मंगळवारी सकाळी प्रदीप गंगाधर जायभाये, राहुल गंगाधर जायभाये (रा.जायभायवाडी) हे दुचाकीवर धारूर कडे येत होते. यावेळी धारूरकडून जाणारे उमेश बिरू भोसले व ओंकारेश्वर श्रीकांत भोसले यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक लागून झालेल्या अपघातात चौघेजण गंभीर जखमी झाले. या अपघातामध्ये एक दुचाकी बराशीत जाऊन पडली होती. जखमींना नागरिकांनी तत्काळ धारूर रुग्णालयात हलविले. तेथे उपचार करून पुढील उपचारासाठी स्वराती रुग्णालय अंबाजोगाई येथे हलवण्यात आले आहे.
जायभायहे हे सख्खे दोघे भाऊ असून, धारूर येथे त्यांचे वेल्डींगचे दुकान असल्याने ते धारूरला येत होते. त्यांच्या दुचाकीवर एक चुलत भाऊ गोकुळ हनुमंत भोसले असे तिघेजण बसलेले होते. अपघातात गोकुळ हनुमंत भोसले यांना किरकोळ दुखापत झाली. अपघात घडलेल्या ठिकाणी खड्डा असल्यामुळे तो चुकवताना अपघात झाल्याची चर्चा होत होतीय.
रस्त्याची अवस्था खूपच वाईट झाल्याने या रस्त्यावर सतत अपघात होऊन प्रवासी जखमी होत आहेत. परंतु याकडे लोकप्रतिनिधी संबंधित अधिकारी लक्ष द्यायला तयार नसल्याने लोकांच्या अडचणी वाढत आहेत. हा रस्ता तात्काळ व्हावा अशी मागणी नागरिक करत आहेत. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.
हेही वाचलंत का?