खोकतंय, शिंकतंय अन् तापलंय! पावसाळा सुरू झाल्याने आणि विषाणूजन्य आजारांमुळे शाळाशाळांतील चित्र | पुढारी

खोकतंय, शिंकतंय अन् तापलंय! पावसाळा सुरू झाल्याने आणि विषाणूजन्य आजारांमुळे शाळाशाळांतील चित्र

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : ‘आज माझ्या मित्राला खूप ताप आला होता. मॅडमनी त्याला घरी पाठवलं…’, ‘चार दिवसांपासून खोकतोय, शाळेत पाठवायलाच नको…’, ‘आमच्या वर्गातल्या खूप मुलांना सर्दी झालीये…’ असे संवाद सध्या घरोघरी कानावर पडत आहेत. पावसाळ्याची सुरुवात, विषाणूजन्य आजारांचे वाढते प्रमाण, यामुळे बहुतांश शाळांतील काही मुलांना थंडीताप, सर्दी, खोकला, अंगदुखी असा त्रास जाणवत आहे.

आजारी असल्यास मुलांना शाळेत पाठवू नका, अशा सूचना शाळांकडून पालकांना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या साथीमुळे तब्बल दोन वर्षे शाळा पूर्णपणे बंद होत्या. मागील शैक्षणिक वर्षामध्ये एक-दोन महिन्यांसाठी शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, प्रत्येक बॅचमध्ये मुलांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली होती. आता शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. पावसाळी वातावरण, तापमानातील बदल अशा विविध कारणांमुळे प्रत्येक शाळेत मुले आजारी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, पालकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन बालरोगतज्ज्ञांनी केले आहे.

लसीकरण पूर्ण करून घ्या
न्यूमोनिया, रोटा व्हायरस, बूस्टर असे लसीकरण कोरोनामुळे मागे पडले असेल, तर ते वेळापत्रकानुसार पूर्ण करून घ्यावे. नवजात बाळाला बी. सी. जी, कावीळ आणि पोलिओ; दीड, अडीच आणि साडेतीन महिन्याला देण्यात येणार्‍या ट्रिपल, हिपेटायटिस बी, रोटा, न्यूमोनिया या लसी वेळापत्रकानुसार देण्यात याव्यात. सहा महिने पूर्ण झाल्यावर इनफ्लुएन्झा प्रतिबंधक लसीची दोन इंजेक्शन्स महिन्याच्या अंतराने देण्यात यावीत. नऊ महिने पूर्ण झालेल्या बाळाला गोवर, गालगुंड, जर्मन गोवर ही लस द्यावी. बूस्टर लस दीड, पाच आणि दहाव्या वर्षी द्यावी.

पोषण आहारात कोरड्या पदार्थांचा समावेश व्हावा
अनेक शाळांमध्ये गरजू मुलांसाठी शालेय पोषण आहार सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत पुरविले जाणारे पदार्थ सकाळी बनविले जातात, दुपारी मुलांना खायला दिले जातात. पावसाळ्यात अन्न खराब होण्याची शक्यता असते. या अन्नामुळे मुलांची तब्येत बिघडू शकते. त्यामुळे बचत गटांनी या काळात खिचडी भातासारखा शिजवलेला ओलसर पदार्थ देण्याऐवजी कोरडा आहार द्यावा, अशा सूचना शासनाने दिल्यास मुलांचे आरोग्य पावसाळ्यात चांगले राहू शकते.

सध्या मुले एकत्रितपणे शाळेला येत आहेत. कोरोनाचे प्रमाणही वाढत आहे. कोरोनाशी साधर्म्य असलेली लक्षणे मुलांमध्ये दिसत आहेत. मुले आजारी असल्यास पूर्ण बरे वाटेपर्यंत शाळेत पाठवू नका, असे पालकांना कळविण्यात आले आहे. शाळेमध्ये स्वच्छता कटाक्षाने पाळली जात आहे. पावसात भिजल्यामुळेही मुले आजारी पडतात. त्यामुळे शाळेत पाठविताना पालकांनी मुले भिजणार नाहीत, याची काळजी घ्यावी. त्यांना डब्यात ताजे अन्न, बाटलीत उकळलेले पाणी द्यावे.

                                             – संजय सोमवंशी, मुख्याध्यापक, सुंदरबाई मराठे विद्यालय, खराडी

सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असणार्‍या लहान मुलांचे प्रमाण वाढले आहे. कोरोना आणि फ्लूची लक्षणे सारखीच असल्याने विषाणुजन्य आजारांचे औषधोपचार मुलांना दिले जात आहेत. पॅरासिटेमॉल गटातील औषधे मुलांना दिली जात आहेत. मुलांचा ताप पाच-सहा दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास लक्षणांनुसार तपासण्या केल्या जातात. मुले मलूल झाली असतील, काहीच खात नसतील, त्वचेवर पुरळ उठत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले. मास्कची सवय मुलांमध्ये कायम ठेवल्यास संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळू शकते.

                             – डॉ. प्रमोद जोग, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना

 

Back to top button