‘सिंहगड’चा पर्यायी रस्ता वीजखांबांमुळे रखडला; पाच लाख नागरिकांना मनस्ताप | पुढारी

‘सिंहगड’चा पर्यायी रस्ता वीजखांबांमुळे रखडला; पाच लाख नागरिकांना मनस्ताप

पुणे : पुढारी वृत्तसेवा: सिंहगड रस्त्याला पर्यायी असलेल्या फनटाईम सिनेमा ते पु. ल. देशपांडे उद्यानापर्यंतच्या कालव्यावरील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, रस्त्याच्या मध्यभागी असलेले विद्युत खांब काढण्याचे काम महापालिकेकडून होत नसल्याने हा रस्ता सुरू करता आलेला नाही. पालिकेचा या कारभाराचा फटका या भागातील जवळपास पाच लाख पुणेकरांना सहन करावा लागत आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. त्यातच या रस्त्यावर आता उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे रोज प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना या भागातील नागरिकांना करावा लागत आहे.

त्यावर पर्याय म्हणून महापालिकेने पु. ल. देशपांडे उद्यानाच्या मागील बाजूपासून थेट फनटाईम सिनेमापर्यंत कालव्याच्या कडेने रस्त्याचे काम सुरू केले होते. हा जवळपास पाच किमीचा रस्ता असून त्यामधील 3 किमीचा रस्ता सुरू झाला आहे. तर जनता वसाहतीपासून मुख्य सिंहगड रस्त्यापर्यंतच्या 2 किमीच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. हा रस्ता कधीही वाहतुकीसाठी सुरू करता येणे शक्य आहे. मात्र, महावितरणचे चार खांब या रस्त्याच्या मध्येच आहेत.

ते काढण्यासाठी पालिकेच्या पथ विभागाने पालिकेच्याच विद्युत विभागाला कळविले आहे. मात्र दीड वर्षापासून हे खांब हटविले गेलेले नाहीत. त्यामुळे हा रस्ता सुरू केल्यानंतर विद्युत खांबाच्या ठिकाणी एकच लेन उपलब्ध होऊन या रस्त्यावरही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल. त्यामुळे या अवघ्या दहा फूट बाय दहा फूट जागा अडवून असलेल्या खांबांचा फटका सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

सिंहगड रस्त्याच्या पर्यायी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, या रस्त्यावर चार ठिकाणी विद्युत खांब असून ते काढण्याबाबत दीड वर्षापासून विद्युत विभागाला कळविले आहे. मात्र, हे खांब अद्याप काढलेले नसल्याने रस्त्याचे काम काही भागात अडून पडले असून रस्ता सुरू करणे शक्य नाही.

                                  – व्ही. जी. कुलकर्णी, पथ विभाग प्रमुख.

रस्त्यावर महावितरणचे खांब असून ते उच्च दाबाचे आहेत. त्याबाबत, महावितरणशी चर्चा करण्यात आली असून पुढील दोन आठवड्यांत हे खांब काढले जातील.

                                  – श्रीनिवास कंदुल, अधीक्षक अभियंता, विद्युत विभाग.

Back to top button