

जालना, पुढारी वृत्तसेवा ः शहरासह जिल्ह्यात सोमवारी पडलेल्या सर्वदूर पावसाने शेतकरी सुखावला आहे. जालना शहरात 64.5 तर वाघ्रुळ येथे 64.3 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात मंगळवारी सकाळपर्यंत चोवीस तासांत 17.50 मि.मी. पाऊस पडला असून आजपर्यंत 129.20 मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात सोमवारी पडलेल्या सर्वदूर पावसाने मंगळवारी खरिपाच्या पेरणीस वेग आला आहे.
गतवर्षी कापसाला चांगले दर मिळाल्याने कापसाचा पेरा यंदा वाढणार असून त्यापाठोपाठ सोयाबीनला शेतकर्यांनी पसंती दिली आहे. यंदा मूग, उडदाच्या पेरणीत मोठी घट होणार आहे. जालन्यासह जिल्ह्यात सर्वदूर पडलेल्या पावसाने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
भोकरदन तालुक्यातील पारधसह काही भागांत अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नसल्याने तेथील पेरण्या खोळंबल्या आहे. जालना शहरात मंगळवारी सकाळपर्यंत 64.5 मि.मी. तर वाघ्रुळ येथे 64.3 मि.मी. पावसाची नोंद झाली.शहरात पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. जालना बसस्थानकातील फुटलेल्या रस्त्यावर पाणी साचून बसस्थानकाला तळ्याचे स्वरुप आले होते.
मंगळवारी सकाळपर्यंत पडलेला पाऊस कंसात आजपर्यंतचा तर कंसाबाहेर 24 तासात पडलेला पाऊस असाः
जालना- 29.90 (150.10 ),
बदनापूर- 27.20 (136.30),
भोकरदन- 17.00 (132.10),
जाफराबाद 7.00 (149.30),
परतूर- 37.50 (108.80) ,मंठा12.00 (127.40), अंबड- 2.20
(123.20), घनसावंगी- 8.80
(105.20) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत असतानाच अद्यापही काही भागांत समाधानकारक पाऊस पडलेला नाही. यामुळे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. पावसामुळे बी-बियाणे व खताच्या दुकानांवर गर्दी झाली असतानाच कृषी सेवा केंद्रातून अनेक खते गायब झाल्याचे दिसून येत आहे.कृषी विभाग मात्र केवळ कागदी घोडे नाचविताना दिसत आहे.
हेही वाचलंत का?