

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : संत सोपानकाका पालखी सोहळ्यात सासवडपासून एक वाघ्या (वारकर्यांनी दिलेले नाव) नावाचा कुत्रा पालखी सोहळ्याचे सर्व नियम पाळत चालत आहे.
संत सोपानकाकांचा पालखी सोहळा पंढरपुरांकडे वाटचाल करीत असताना सासवडवरून एक श्वानही पालखीसोबत चालत आहे. श्वानाचा कुणालाही उपद्रव नाही. दोन वेळा टाकलेले अन्न खातो. वारकर्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, अशा पद्धतीने जणुकाही वारीच करायची, अशापद्धतीने तो वारीत सामील झाला आहे. वारीची परंपरा हा मुका प्राणीही जपताना दिसत आहे.
….कोण्या श्रद्धाळू भक्ताने त्याच्या गळ्यात झेंडूच्या फुलांचा हार घातलाय याचा त्याला ना खेद ना आनंद..पण दिंडीबरोबर चालणे त्या मुक्या जिवाने बांधिलकी मानली आहे एवढे मात्र खरे.. चालतानाही त्याचे तोंड खाली असते. जणू माणसांना तो विठ्ठलाकडे जाताना विनम्रतेने जावे, असा संदेश देत आहे. संत नामदेवांना कुत्र्यात देव दिसला. त्याच्या पोटात दुखू नये म्हणून तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे धावणारे संत नामदेव आपण वाचले आहेत. देव शोधता आला पाहिजे, पाहता आला पाहिजे, ही दृष्टी अलीकडे कमी झाली असल्याची भावना वारीतील जुन्या वारकर्यांकडून व्यक्त केली जात आहे.