कंधार : सर्पमित्र काळे यांनी दिले 10 हजार सापांना जिवदान; खवल्या मांजरासह वानराचेही वाचवले प्राण | पुढारी

कंधार : सर्पमित्र काळे यांनी दिले 10 हजार सापांना जिवदान; खवल्या मांजरासह वानराचेही वाचवले प्राण

कंधार, पुढारी वृत्तसेवाः साप दिसला की, बर्‍याच जणांची बोलती बंद होते; परंतु, सर्व साप हे विषारी नसतात. साप दिसला की, त्याला मारण्याचा विचार झटकन डोक्यात येतो. पण सापाला न मारता एक फोन केला, तर सर्पमित्र सिध्दार्थ काळे हा काही वेळातच तेथे पोहचतो. व सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडतो. आजपर्यंत सर्पमित्र सिध्दार्थ काळे यांनी 10 हजार सापासह खवले मांजर, पिसाळलेले वानर, मगर यांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले. त्यामुळे या प्राण्यांना जीवदान मिळाले आहे.

कंधार, मुखेड व जळकोट या तिन्ही तालुक्यात एकटाच सर्पमित्र असून पावसाळ्यात जास्त धावपळ करावी लागते. कंधार शहरातील शहाजीनगर येथील रहिवासी मुन्ना आढाव यांच्या घरामध्ये साप दिसून आला.आढाव यांच्या परिवारात लहान मुले व महिला असल्यामुळे त्यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मुन्ना आढाव यांनी निसर्गाचे संतुलन राखुन सापाला मारण्यापेक्षा वाचविण्यात खरा आनंद आहे, हे ध्येय बाळगत त्यांनी सर्पमित्र सिध्दार्थ काळे यांना फोन केला, काळे हे शेतामध्ये पेरणीच्या कामात व्यस्त होते. त्यांनी त्या सापावर लक्ष ठेवण्यास सांगितले.

सहकारी मित्र राजू गायकवाड यांना सोबत घेऊन काळे यांनी 30 ते 35 किलोमीटर अंतर कापत आढाव यांचे घर गाठले. या सापाला यशस्वीरित्या पकडले. सर्पमित्र सिध्दार्थ काळे यांनी आढाव कुटुंबीयांना त्या सापाविषयी सविस्तर माहिती देऊन त्यांच्या मनातील भिती व काही गैरसमज तसेच अंधश्रध्दा दूर केली. आढाव यांच्या घरी आढळलेला साप धामण जातीचा असून, तो बिनविषारी गटात मोडणारा आहे. धामण हा साप शेतकर्‍यांचा खरा मित्र आहे. हा साप शेतकर्‍यांच्या अन्नाधान्याची नासाडी करणार्‍या उंदरावर पूर्णतः नियंत्रण ठेवतो. धामण या सापाची सरासरी लांबी 6 फूट 6 इंच असते, अधिकतम लांबी 11 फूट 6 इंच असते. या सापाचे प्रजनन मार्च ते मेदरम्यान होते. मादी साप 8 ते 20 अंडी घालते, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बिळामध्ये पाणी जाऊन साप बिळाबाहेर पडत आहेत. सापाला जास्त थंडी सहन होत नाही.

मी दहा वर्षापासून सापांना जिवदान देण्याचे काम करतो. आतापर्यंत 10 हजार सापांना वाचविले असून, सर्वांत विषारी साप मण्यार, घोणस, नाग व फुरसे हे आहेत. या विषारी सापांसह मगर, हरीण, मोर, उदमांजर, खवल्या मांजर, घोरपड, सारसोळ, मुंगूस, पिसाळलेले वानर, माकड यांना पकडून निसर्गात सोडून जिवदान दिले. मी सध्या शेलदरा, ता. जळकोट येथे राहतो.शासनाकडून एकही रुपयाचे अनुदान किंवा मानधन मिळत नाही किंवा यदाकदाचित अपघात झाला, तर विमाही नाही. त्यामुळे काम करत असताना घटनास्थळी पोचण्यासाठी आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. आपल्या परिसरात जखमी पशू, पक्षी व साप आढळल्यास नागरिकांनी संपर्क साधावा.
– सिद्धार्थ काळे, सर्पमित्र

Back to top button