शिंदेसेनेचा पलटवार! विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांच्यावरच अविश्वास प्रस्ताव | पुढारी

शिंदेसेनेचा पलटवार! विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांच्यावरच अविश्वास प्रस्ताव

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आजचा चौथा दिवस आहे. शिंदेंच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच शिवसेनेकडूनही बंडखोर आमदारांविरुद्ध कारवाईस सुरूवात करण्यात आली. आतापर्यंत 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे करण्यात आली आहे. पण विधानसभा अध्यक्ष आमदारांना अपात्र ठरवू शकतात असा प्रश्न निर्माण झाला आहे. याला कारण म्हणजे खुद्द विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यावरच अविश्वास प्रस्ताव दाखल झाला आहे, आणि तोही सध्याच्या राजकीय घडामोडींपूर्वीच. त्यामुळे विधानसभा उपाध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेचे अधिकारच नाहीत या आशयाचं पत्र विनोद अग्रवाल आणि महेश बालदी या दोन अपक्ष आमदारांनी लिहिलं आहे. विधान मंडळाच्या सचिवांना हे पत्र देण्यात आलं आहे.

अपक्ष आमदरांच्या पत्रात म्हटलं की, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेऊ शकत नाहीत. उपाध्यक्षांच्या पदाविषयी वाद आहे. त्यांच्या विरोधात २१ जूनलाच अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे घटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार उपाअध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल असेल तर त्यावर निर्णय होईपर्यंत त्यांच्याकडे आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार राहत नाहीत. अग्रवाल आणि बालादींनी आपल्या पत्रात २०१६ च्या अरूणाचल प्रदेश विधानसभेच्या खटल्याविषयीच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अहवाल दिला आहे.

नरहरी झिरवळ यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव अपक्ष आमदारांनी २१ जूनलाच दाखल केला आहे. त्यामुळे कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवण्याचे अधिकार त्यांच्याकडे नाहीत अशी चर्चा आहे. तसेच २१ जूननंतर कितीही प्रस्ताव दाखल झाले तरी आधी झिरवळ यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेऊन त्यानंतरच आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा निर्णय आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे.

आमदारांना अपात्र ठरवा, शिवसेनेची मागणी

आधी बारा आमदारांना निलंबित करण्याची मागणी केल्यानंतर शिवसेनेने (Shiv Sena) आणखी पाच बंडखोर आमदारांना अपात्र करण्यासाठी दुसरा अर्ज विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिला आहे. त्यावर झिरवाळ कोणता निर्णय घेतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

मुंबईतील दादर येथील आमदार सदा सरवणकर, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकाश आबिटकर, मेहकर विधानसभा मतदासंघाचे आमदार संजय रायमुलकर, नांदेडचे बालाजी कल्याणकर आणि वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांना अपात्र ठरविण्यात यावे, असे पत्र शिवसेनेचे नवे गटनेते अजय चौधरी यांनी दिले आहे.

शिवसेनेने आपल्या आमदारांची वर्षा बंगल्यावर बैठक बोलवली होती. जे आमदार या बैठकीला येणार नाहीत, त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणास्तव कारवाई केली जाईल, असा इशारा शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी पत्राद्वारे दिला होता. या बैठकीला १७ आमदारच उपस्थित होते. त्यामुळे पहिल्यांदा १२ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी शिवसेनेने केली. त्यानंतर शुक्रवारी आणखी पाच आमदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली. जर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या १७ आमदारांना अपात्र ठरविले, तर सभागृहात बहुमत चाचणीवेळी त्यांना मतदान करता येणार नाही.

Back to top button