औरंगाबाद : सहकाऱ्यानेच केला घात; पोलिस अधिकाऱ्यावर चाकू खुपसून वार | पुढारी

औरंगाबाद : सहकाऱ्यानेच केला घात; पोलिस अधिकाऱ्यावर चाकू खुपसून वार

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : पोलीस निरीक्षकावर माजी पोलीस कॉन्स्टेबलने चाकूहल्ला केल्याची खळबळजनक घटना जींसी ठाण्यात मंगळवारी (दि.२१) रात्री घडली. दोनवेळा चाकू पोटात खुपसण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यात पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे हे ड्युटीकरिता ठाण्यात पोहोचले. तेथे सत्कार कार्यक्रम असल्याने ते पार्किंग परिसरातच थांबले होते. त्याचवेळी माजी कर्मचारी मुजाहेद शेख हे तेथे आले. त्यांच्यात कुठल्या तरी विषयावरून संभाषण सुरू झाले. त्यानंतर त्यांनी अचानक केंद्रे यांच्यावर चाकूहल्ला केला. धक्कादायक म्हणजे शेख यांनी दोनवेळा केंद्रे यांच्या पोटात आणि छातीत चाकू खुपसला. आरडाओरड झाल्यानंतर इतर अधिकारी, कर्मचारी तेथे जमा झाले. त्यांनी शेखला रोखले. केंद्रे यांना तत्काळ जवळच्या अपेक्स रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त डॉ. निशिकांत भुजबळ, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी भेट देत पाहणी केली.

उपचारासाठी धावाधाव

अपेक्स हॉस्पिटलमध्ये केंद्रे यांना दाखल केल्यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी तत्काळ दाखल झाले. पोलीस आयुक्त, उपायुक्त यांच्यापासून सर्वांनी उपचारासाठी रुग्णालयात धावाधाव केली. रक्ताची गरज पडली तर तात्काळ रक्त देखील मागविले आहे.

कर्मचारी नशेत असण्याची शक्यता

पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्यावर हल्ला करणारे माजी पोलीस कर्मचारी मुजाहेद शेख हे नेहमी नशेत असतात. हल्ला केला तेव्हाही तो नशेत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हल्ला करणारा पोलिस कर्मचारी शेख यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. 5 जून रोजी त्यांची ऑर्डर स्विकारली आहे, अशी माहिती उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी दिली

हेही वाचा

Back to top button