परभणी : ‘रिलायन्स कंपनी गो बॅक’ चा नारा देत पीक विम्यासाठी भाजपचे आंदोलन | पुढारी

परभणी : 'रिलायन्स कंपनी गो बॅक' चा नारा देत पीक विम्यासाठी भाजपचे आंदोलन

गंगाखेड : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील महातपुरी येथे ‘रिलायन्स कंपनी गो बॅक’ असा नारा देत शेतकऱ्यांनी थकीत पीक विमा देण्यासाठी रिलायन्स कंपनीच्या प्रतिनिधींची प्रतिकात्मक होळी केली. भाजपचे परभणी जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) डॉ. सुभाष कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

डॉ. सुभाष कदम यांनी मागील वर्षभरात शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा, यासाठी मोठी ग्राम चळवळ उभी केली आहे. परभणी जिल्ह्यातील २ लाख ७२ हजार ३२५ शेतकऱ्यांचा ३१० कोटींचा पीक वीमा हडपण्याचा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचा प्रयत्न आहे. याविरोधात गंगाखेड तालुक्यातील महातपुरी येथे मोठे जनआंदोलन करत रिलायन्स कंपनीचा प्रतिनिधी प्रतिकात्मक होळी करण्यात आली.

याप्रसंगी भाजप तालुका उपाध्यक्ष मनोहरराव मुलगीर, वैजनाथराव भंडारे, भास्कर जाधव, अल्पसंख्याक मोर्चाचे तालुकाध्यक्ष शेख मुस्तफा, भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस रामेश्वर निळे, मुलगीर अंबादासराव, शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींनी भूमिका जाहीर करण्याचे भाजपचे आव्हान

परभणी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पीक विमा प्रश्नी आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच आपण जनतेचे लोकप्रतिनिधी आहात की रिलायन्स कंपनीचे प्रतिनिधी आहेत, हे एकदाचे स्पष्ट करावे, असे आव्हान यावेळी आंदोलनाचे संयोजक डॉ. सुभाष कदम यांनी केले. तसेच परभणी जिल्ह्यातील समस्त शेतकऱ्यांना जोपर्यंत पीक विमा मिळत नाही. तोपर्यंत रिलायन्स कंपनी विरोधातील जन आंदोलन थांबणार नाही, असा इशारा यावेळी डॉ. कदम यांनी दिला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button