बीड : पैगंबर मोहम्मद यांच्याबाबतीत अपशब्द वापरल्याप्रकरणी नुपूर शर्माविरोधात आष्टीत निषेध | पुढारी

बीड : पैगंबर मोहम्मद यांच्याबाबतीत अपशब्द वापरल्याप्रकरणी नुपूर शर्माविरोधात आष्टीत निषेध

आष्टी; पुढारी वृत्तसेवा : भाजपची महिला प्रवक्ता नुपूर शर्मा व नवीन जिंदल या दोघांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबाबतीत अपशब्द वापरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या. याप्रकरणी दोघांना अटक करून गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे यांना मोठ्या संख्येने जमलेल्या मुस्लिम समाजाकडून शुक्रवारी (ता.१०) तहसील कार्यालय प्रांगणात देण्यात आले.

हजरत पैगंबर मोहम्मद हे मुस्लिम धर्मियांचे प्रेरणास्थान असून आदर्श आहेत. भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रवक्ता नुपूर शर्मा व नवीन जिंदल या दोघांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित हजरत पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल चर्चेदरम्यान अपशब्द वापरले आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या वक्तव्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पडसाद उमटले असून सर्वत्र निषेध नोंदवला जात आहे असे निवेदनात म्हटले आहे.

नुपूर शर्मा व नवीन जिंदल यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत दिल्लीच्या दारुल उलूम देवबंद यांच्या वतीने काल भारत बंदची हाक देण्यात आली होती. तसेच दोघांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती. परंतु, अद्याप या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नसून गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. यामुळे नुपूर शर्मा व नवीन जिंदल यांना अटक करून गुन्हा दाखल करण्याची मागणी उपस्थित जनसमुदाय वक्त्यांनी मार्गदर्शन करून केली. यावेळी आष्टी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button