बीड : लालपरीत पुन्हा ‘खट -खट’; तिकीट मशीन बंद असल्याने अनेक आगारांची ‘बिकटस्थिती’

file photo
file photo
Published on
Updated on

बीड ; गजानन चौकटे

लॉकडाऊननंतर व एसटी कर्मचाऱ्याच्या संपानंतर आता गेवराई आगारातील पूर्ण क्षमतेने लांब पल्ल्याच्या गाड्या धावू लागल्या आहेत; मात्र तांत्रिक अडचणीमुळे तिकीट मशीन (ईटीआय) बंद पडण्याचे प्रकार आता वाढू लागले आहेत. गेवराई आगारातील अनेक तिकीट मशीन बंद असून, काही मार्गांवर वाहक जुन्या तिकिटांचा वापर करुन प्रवाशांना सेवा देत असल्याची माहिती प्रभारी आगारप्रमुख बालाजी आडसूळ यांनी 'पुढारी'शी बोलताना दिली.

लॉकडाऊन व त्‍यानंतर  संपकाळात राज्यभरातील एसटी सेवा पूर्ण बंद होती. परिणामी या कालावधीमध्ये मशीनचा वापरही बंद होता़. सध्या ईटीआय मशीन वापरास सुरू केल्यानंतर मशीन बंद पडण्याच्या तक्रारी वाढत आहेत़. एस. टी. प्रशासनाला खासगी कंपनीकडून या मशीनचा पुरवठा केला जातो़. सध्या अनेक विभागात एसटीच्या पूर्ण क्षमतेने फेऱ्या सुरू झालेल्या आहेत. यामुळे ईटीआय मशीनची कमतरता भासत आहे. अचानक मशीन बंद पडल्याने वाहकांना मात्र मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे़.

वाहकांच्या हातात पूर्वी प्रमाणे तिकिटाचा ट्रे

तिकीट लवकर न येणे, मशीन हँग होणे, चार्जिंग लवकर उतरणे, कोणतेही बटन दाबल्यास ठराविक बटन दाबले जाणे, कार्ड रिड होण्यास विलंब लागणे अशा अनेक समस्या वाहकांना येत आहेत़. गेल्या अनेक दिवसांपासून मशीन वापरात नसल्याने अडचणी येत होत्या़, पण कोणत्याही विभागात मशीनमुळे काम बंद पडले नसले, तरी लालपरी धावू लागताच तिकीट तिकीट चा आवाज कानी येऊ लागला आहे. तर वाहकांच्या हातात पूर्वी प्रमाणे तिकिटाचा ट्रे दिसू लागला आहे.परंतु बंदच्या काळाचा परिणाम म्हणून तिकीट मशीन देखील खराब झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. यामुळे एसटी कंडक्टर पूर्वीप्रमाणेच तिकीट तिकीट म्हणत हातात पुन्हा पंचिंग मशीन वाजवत असल्याचे चित्र सध्या गेवराई आगारात दिसत आहे.

बसेस निर्धारित वेळेपेक्षा अर्धा ते एक तास उशिराने

गेल्या अनेक दिवसांपासून तिकीट यंत्रणांमध्ये बिघाड झाल्याने अनेक बसेस निर्धारित वेळेपेक्षा अर्धा ते एक तास उशिराने सोडण्यात येत आहेत. यामुळे एसटीचा भोंगळ कारभार समोर आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे एसटी रेल्वेद्वारे प्रवासासाठी तिकीट खिडकीवर गेल्यानंतर कडक पुठ्ठ्या च्या तिकिटावर प्रवासाच्या तारखेचा पंचिंग करणाऱ्या मशीनची तिकीट उपलब्ध आहे, तर गावातील एसटीने देखील गेल्या पंधरा-सोळा वर्षांपासून आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारल्यामुळे कंडक्टरच्या एका खांद्यावर तिकिटांच्या ॲल्यूमिनीअमचा ट्रे तर दुसऱ्या खांद्यावर पैशांची चामडी बॅग असे आणि एका हाताने प्रवासाची तिकिटे मोजून थांब्याच्या क्रमानुसार पंचिंगच्या चिपळीने टकटक करणारा बस कंडक्टर दिसण बंद झालं होतं. मात्र तिकीट मशीनच्या बिघाडामुळे कंडक्‍टरच्या हातात पुन्हा ते तिकिटाचे पंचिंग मशिन आणि तिकिटांचा ट्रे दिसू लागला आहे.

गेवराई आगारातून जाण्यासाठी अनेक दूरवरच्या बसेस या ठिकाणाहून धावतात, परंतु अनेक मशीन बंद असल्याकारणाने पुन्हा एकदा जुने ट्रे वापरात येत आहेत.

नवीन कंडक्टरच्या डोक्याचे खोबरे… 

नवीन भरती झालेल्या वाहकांना आगारातून घेतलेल्या तिकिटांचे सिरीज नुसार क्रमांक बुकिंग झाल्यानंतर त्‍यानुसार विक्री झालेली तिकीट याची नोंद कॅटलॉग मधे करणं अवघड आहे. त्यामुळे ऐनवेळेस जुन्या वाहकांना या मार्गावर पाठवण्यासाठी आगारप्रमुखांची धादल उडत असून जुन्या वाहकाची शोधाशोध करावी लागत आहे. तसेच अडगळीत पडलेल्या तिकीटाचे ट्रे काढून पुन्हा उपयोगात आणले जात आहेत. यात दहा, वीस, पाच आणि अन्य छापील तिकीट जोडून देण्यात येत आहेत. सुट्या पैशांची तिकीट नसल्याने दिलेले तिकीटाचा मेळ व उर्वरित तिकीटाचा मेळ बसविताना वाहकांच्या नाकीनऊ येत आहे. तर नव्याने भरती झालेल्या बर्‍याच वाहकांच्या डोक्याचे यामुळे खोबरे होत आहे.

गेवराई आगारात एकूण १०० तिकिटाच्या मशीन आहेत परंतू या पैकी फक्त ३२ मशीन चालू आहेत, तर ४५ मशीनची गेवराई आगाराला आवश्यकता आहे. इतर मशीन दुरूस्तीसाठी पाठवल्या आहेत. वरिष्ठांकडे या विषयी वारंवार विचारले असता मशीन उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. तर दुरूस्त करण्यासाठी वेळ लागेल असे सांगण्यात येते. मशीन बंद असल्यामुळे खूप मोठे नुकसान होत असून, उत्पन्न देखील कमी येते. तसेच अनेक वाहक ट्रे नको म्हणतात. त्‍यातच आहेत त्या मशीन सुध्दा बंद पडतात यामुळे वाहकांची डोकेदुखी वाढली आहे.
बालाजी आडसूळ
प्रभारी आगारप्रमुख, गेवराई

हे ही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news