हिंगोली : रूखी शिवारातील कालव्यात आढळला तरुणाचा मृतदेह | पुढारी

हिंगोली : रूखी शिवारातील कालव्यात आढळला तरुणाचा मृतदेह

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : वसमत तालुक्यातील रूखी शिवारात असलेल्या कालव्यामध्ये अनोळखी तरुणाचा मृतदेह रविवारी (दि. ५ जून) सायंकाळी आढळून आला आहे. हट्टा पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. वसमत तालुक्यातील रूखी शिवारात असलेल्या सिद्धेश्वर धरणाच्या कालव्यामध्ये रविवारी सायंकाळी एका तरुणाचा मृतदेह पाण्यासोबत वाहून येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, जमादार राजू ठाकुर, संदीप सुरोशे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला. सदरील मृतदेह ३० ते ३२ वर्ष असलेल्या तरुणाचा असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सदर मृतदेहाच्या कपड्यांतील खिशामध्ये ओळख पटविण्यासाठी कुठल्याही प्रकारची वस्तू नसल्याने पोलिसांनी आता बेपत्ता तरुणाचा शोध सुरू केला आहे.

शोधकार्यासाठी हिंगोली जिल्ह्यासोबतच परभणी जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. दरम्यान सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे. सदर तरुण शनिवारी कालव्यात पडला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button